दळणवळण बंदीच्या काळात नियमभंग करणार्‍यांवरील गुन्हे मागे घेणार – अनिल देशमुख, गृहमंत्री

मुंबई – कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीच्या काळातील नियमभंगाचे गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख केली. रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या नागरिकांवर पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १८८ अन्वये चालू केलेली कारवाई थांबवण्याचे संकेत गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

दळणवळण बंदीच्या काळात लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला होता. तरीही रस्त्यावर दिसलेल्या नागरिकांना पोलिसांनी समज देऊन घरी सोडतांना त्यांची नावे लिहून घेतली होती. पोलिसांनी आता अशा नागरिकांविरोधात कारवाई चालू केली आहे. त्यांना कारवाईच्या नोटीस पाठवण्यात येत आहेत. त्यानुसार टाळेबंदीच्या काळात नियमांचा भंग केल्याप्रकरणी दोषी ठरणार्‍या नागरिकांना १ मासाचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

राज्यात सुमारे ५ लाख लोकांनी दळणवळण बंदीच्या काळात नियमभंग केला असून पुणे शहरात २८ सहस्र नागरिकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मानवतावादी भूमिका घेऊन कलम १८८ नुसार पाठवण्यात आलेल्या नोटिसा रहित कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांकडे केली होती. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, दळणवळण बंदीच्या काळात अनेकजण नाईलाजास्तव घराबाहेर पडल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे न्यायिक प्रक्रिया पूर्ण करून हे खटले मागे घेतले जातील. लोकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी शासन घेईल.