नागपूर येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

नागपूर – येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. याविषयीचा शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. नागपूरजवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत असून त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनवण्यात आला आहे.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे वैविध्यपूर्ण असून त्यामधील सफारीचे काम पूर्ण झाले आहे. ही सफारी २६ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जनतेसाठी खुली केली जाणार आहे. या सफारीमध्ये व्याघ्र सफारी, बिबट्या सफारी, अस्वल सफारी, तृणभक्षी प्राणी सफारी कार्यान्वित करण्यासाठी प्राण्यांचे स्थलांतरणही करण्यात आलेले आहे. सफारीचे उद्घाटन झाल्यानंतर ४० आसन क्षमतेची ३ विशेष वाहने आणि ‘ऑनलाईन’ तिकीट बुकींग सुविधा जनतेसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.