जळगाव – १९ जानेवारी या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा हटवण्याच्या कारणावरून ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यात वाद झाला. त्यानंतर काही ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात एका पोलीस अधिकार्यासह ३ पोलीस कर्मचारी किरकोळ घायाळ झाले आहेत. येथे पोलिसांचा बंदोबस्त आहे.
१८ जानेवारी या दिवशी मध्यरात्रीनंतर अज्ञात व्यक्तींनी गावातील मुख्य चौकात एका ठिकाणी चबुतरा बांधून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला. पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकार्यांनी ग्रामस्थांची समजूत घालत पुतळा अनधिकृतपणे बसवलेला असल्याने तो हटवण्याची विनंती केली; मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ‘पुतळा याच ठिकाणी राहील’, अशी आग्रही मागणी गावकर्यांनी लावून धरली. तहसीलदार श्वेता संचेती ग्रामस्थांची समजूत घालत असतांनाच अचानक दगडफेकीला प्रारंभ केला.