म्हापसा, १७ जानेवारी (वार्ता.) – कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आणि तपोभूमी गुरुपीठ अधिष्ठित संत समाज कळंगुट समितीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लक्ष्मण लिंगुडकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. या बैठकीत संत समाजाचे अध्यक्ष सुशांत मठकर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले, तसेच राजाराम, अपर्णाताई, कांती शिरोडकर, सरोज, उदय, सिद्धेश, साईल यांनी बैठकीत महत्त्वाच्या सूचना करून योगदान दिले. सर्वांच्या संमतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी, तसेच १९ जानेवारी २०२१ या दिवशी शिवजयंती मिरवणूक आयोजनासाठी कार्यरत होण्याचे ठरले. या संयुक्त बैठकीत श्री शांतादुर्गादेवीच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्प होऊ घातलेल्या कटकारस्थानाचा निषेध करून हा प्रकल्प देवीच्या जागेतून हटवण्यासाठी प्रयत्न करणार्यांना पाठिंबा देण्याचे ठरवण्यात आले. माऊलींच्या नामस्मरणाने बैठकीचा प्रारंभ झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषाने बैठकीची सांगता झाली. (छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी आणि श्री शांतादुर्गादेवीच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्प होऊ न देण्यासाठी प्रयत्नरत रहाण्याचा निर्णय घेतल्याविषयी कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आणि तपोभूमी गुरुपीठ अधिष्ठित संत समाज कळंगुट समितीचे पदाधिकारी यांचे अभिनंदन ! – संपादक)