बांधकाम व्यावसायिकाला ग्राहकांवर एकतर्फी करार लादता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

वेळेवर घर बांधून न दिल्यास ९ टक्के व्याजासह पूर्ण रक्कम परत करावी !

नवी देहली – घर घेणार्‍यांवर बांधकाम व्यावसायिक एकतर्फी करार लादू शकत नाही. कराराची एकतर्फी अट मान्य करण्यास तो खरेदीदारास बाध्य करू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने ‘ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सदनिका खरेदी कराराची अट एकतर्फी आणि तर्कसंगत नसणे अनुचित व्यापार आहे’, असे म्हटले आहे. ‘ग्राहकाला वेळेवर घर न दिल्यास बांधकाम व्यावसायिकाला टाळाटाळ न करता खरेदीदाराला पूर्ण रक्कम ९ टक्के व्याजासह परत करावी लागेल’, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

हरियाणाच्या गुरुग्राममधील एका प्रकल्पावर सुनावणी करतांना न्यायालयाने हा निर्णय दिला. या प्रकल्पाच्या बांधकाम व्यावसायिकाने राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याच्या विरोधात कठोर भूमिका घेत म्हटले की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्यास घर खरेदीदारास पूर्ण रक्कम (या प्रकरणात १ कोटी ६० लाख रुपये) १२ टक्के व्याजासह चुकवावी लागेल.