बलात्काराची लेखी तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवणे बंधनकारक असतांना पोलिसांकडून कारवाई नाही

 धनंजय मुंडे यांचे प्रकरण

धनंजय मुंडे

मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराची लेखी तक्रार करूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. लेखी तक्रार केल्यावर प्रथम माहिती अहवाल (एफ्आयआर्) नोंदवणे भाग असते; परंतु पोलिसांनी तसे केलेले नाही. बलात्कार, लैंगिक अत्याचार यांसारख्या तक्रारींच्या विषयीही तात्काळ गुन्हा नोंदवून नंतर चौकशी करण्याचे बंधन सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना पूर्वीच्या निवाड्यांद्वारे घातलेले आहे.
पोलिसांनी टाळाटाळ केल्याने या महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या महिलेने ही तक्रार पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक, गृहमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि पंतप्रधान कार्यालय येथेही पाठवली आहे. मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला का, याविषयी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना विचारले असता त्यांनी पत्रकारांना प्रतिसाद दिला नाही. दखलपात्र गुन्ह्याविषयी प्रथम माहिती अहवाल (एफ्आयआर्) नोंदवून घेतला नाही, तर संबंधित सरकारी कर्मचार्‍याला ६ मास ते २ वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.