नवी देहली – यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनामध्ये बांगलादेशचे सैनिक सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. बांगलादेश मुक्ती संग्रामाला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे सैनिक सहभागी होणार आहेत. भारतीय उच्चायुक्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेश सशस्त्र दलाच्या १२२ सैनिकांची तुकडी भारतीय वायूसेनेच्या सी-१७ या विशेष विमानाने भारतात दाखल झाली आहे. कोरोना नियमानुसार ही तुकडी १९ जानेवारीपर्यंत विलगीकरणात रहाणार आहे. एखाद्या परदेशी सैन्याच्या तुकडीला प्रजासत्ताकदिनाच्या संचलनामध्ये सहभागी करून घेण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी फ्रान्स आणि संयुक्त अरब आमिरात यांच्या तुकड्या राजपथावरील संचलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.