राज्य कोरोना लसीकरणासाठी सिद्ध

मुंबई, १३ जानेवारी (वार्ता.) – राज्यात कोरोना लसीकरणाची सिद्धता चालू असून सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीच्या ९ लाख ६३ सहस्र मात्रा (डोस) प्राप्त झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्यांचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार असून ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.

राज्यात आतापर्यंत कोवीन पोर्टलवर ७ लाख ८४ सहस्रांहून अधिक आरोग्य कर्मचार्‍यांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यात ३ सहस्र १३५ शितसाखळी केंद्र उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर कोरोना लसीकरण तज्ञांचा गट (एन्.इ.जी.व्ही.ए.सी.) स्थापन केला आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी चालू करण्यात आली आहे.

लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरवण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी (हेल्थ केअर वर्कर्स) यामध्ये शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे.

आरोग्य कर्मचार्‍यांचा लसीकरणासाठी ९ गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. फ्रंट लाईन वर्कर्समध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस दल, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, महानगरपालिका कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसर्‍या गटात ५० वर्षांवरील सर्व व्यक्ती आणि ज्यांना अन्य आजार आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.