मुंबई – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांतील अस्थायी वैद्यकीय अधिकार्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करणे, तसेच सातवा वेतन आयोग लागू करणे या मुख्य मागण्यांसाठी ११ जानेवारी या दिवशी सकाळपासून राज्यभरातील वैद्यकीय अधिकारी संपावर गेले आहेत. अनुमाने ४५० वैद्यकीय अधिकार्यांनी (आधुनिक वैद्य) सकाळी ८ वाजल्यापासून काम बंद केले आहे. याचा परिणाम वैद्यकीय सेवेवर होतांना दिसत आहे.
वरील २ मागण्या कित्येक मासांपासून आहेत. यासाठी नोव्हेंबर मासातही आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी या अधिकार्यांना कायमस्वरूपी सेवेत भरती करून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण हे आश्वासन हवेतच विरले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री असा सरकारी स्तरावर पाठपुरावा करूनही सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालयांत संप चालू आहे.