बहुतांश देशी पर्यटक स्वतःजवळ अमली पदार्थ बाळगत असल्याचा गोवा पोलिसांचा दावा

पणजी, ३० डिसेंबर (वार्ता.) – सध्या गोव्यात देशी पर्यटक मोठ्या संख्येने आलेले असल्याने पर्यटन व्यावसायिक आनंदात आहेत; परंतु गोवा पोलिसांना मात्र एका वेगळ्या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. गोव्यात मजा करण्यासाठी येणारे देशी पर्यटक स्वतःजवळ अमली पदार्थ बाळगतात, असे पोलिसांना आढळून आले आहे. गोवा पोलिसांनी टाकलेल्या अनेक छाप्यांमध्ये त्यांना पर्यटक अमली पदार्थ समवेत बाळगत असल्याचे आढळून आले. सध्या गोव्यात देशी पर्यटकांचे प्रमाण अधिक आहे. ते शेजारील राज्यांतून स्वतःच्या वाहनाने गोव्यात येतात. गोव्यातील अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक महेश गावकर म्हणाले, ‘‘उत्तर कर्नाटक किंवा महाराष्ट्र या राज्यांतून येणारे देशी पर्यटक त्यांच्यासमवेत अमली पदार्थ आणतात. त्याचप्रमाणे अनेक स्थानिक युवक या अमली पदार्थांच्या व्यापारात सहभागी आहेत. स्थानिक युवक अधिकतः गांजा विकत घेत आहेत; कारण शेजारील राज्यात गांजा सहजरित्या उपलब्ध होत आहे. हा अमली पदार्थ स्वस्त असल्याने अनेक कामगारही तो खरेदी करतात, तसेच हा पदार्थ बाळगल्यास होणारी शिक्षाही अल्प आहे. याचा लाभ अमली पदार्थ व्यावसायिक घेत आहेत. ते रासायनिक अमली पदार्थ विकण्यापेक्षा नैसर्गिक अमली पदार्थांची विक्री करत आहेत.’’ बेरोजगारीमुळे स्थानिक लोक या व्यापारात आहेत, हे म्हणणे गावकर यांनी खोडून काढले. ते म्हणाले, ‘‘गोव्यात पैसे मिळवण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. गोव्याबाहेरील लोकांचा विषय वेगळा आहे; परंतु गोव्यात रहाणार्‍यांना त्यांच्या उपजिविकेसाठी अमली पदार्थांच्या व्यापारावर अवलंबून रहाण्याची आवश्यकता नाही.’’