गांजा लागवडीविषयी तूर्त विचार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी – गांजा लागवडीच्या प्रस्तावावर तूर्तास कोणताही विचार नाही. लागवड जरी केली, तरी ती केवळ औषधापुरतीच असेल. गांजावरून चालू असलेल्या चर्चा चुकीच्या असून गांजा लागवडीच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
गांजा उत्पादनाला गोवा शासनाने अधिकृतरित्या मान्यता दिल्यास पुष्कळ वाईट परिणाम होतील ! रोहन खंवटे
पणजी – पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी गोव्यात गांजा उत्पादनाला अधिकृत मान्यता देण्याविषयीच्या शासनाच्या विचारावर इतर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांप्रमाणे टीका केली आहे. रोहन खंवटे यांनी ट्वीट करून शासनाच्या या धोरणाचा निषेध केला आहे.
ते म्हणाले, ‘‘गोव्यात गांजाची लागवड करण्यास शासनाने मान्यता दिल्यास त्याचा युवा पिढीवर परिणाम होऊन इथे अमली पदार्थ संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल. गांजा उत्पादनाला मान्यता देण्याचे अत्यंत वाईट परिणाम होतील. गोव्यात अमली पदार्थ संस्कृती, गुन्हे, भ्रष्टाचार यांसाठी प्रोत्साहन मिळाल्याने युवकांवर वाईट परिणाम होईल. जनतेचा विनाश करणार्या या निर्णयाला गोव्याचे मुख्यमंत्री पाठिंबा देतात, हे लज्जास्पद आहे. या उत्पादनाला अधिकृत मान्यता दिल्यास त्याचा गैरवापर करण्यात येऊन समाजाची शांतता भंग होईल.’’ या आधी गोवा फॉरवर्ड पक्षाने अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही गोवा शासनाच्या या धोरणावर टीका केली होती.
गांजा उत्पादनाच्या प्रस्तावाला भाजपचा विरोध असेल ! – सदानंद शेट तानावडे
पणजी – गोव्यात गांजाचे उत्पादन करणे हे स्वीकारार्ह नाही आणि भाजप या प्रस्तावाचा तीव्र विरोध करेल, असे विधान गोव्यातील भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘मी मुख्यमंत्र्यांशी याविषयी बोललो आहे. ‘या प्रकारचे उत्पादन गोव्यात करण्याचा निर्णय होणार नाही’, असे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आहे.’’
मंत्री मायकल लोबो म्हणाले, ‘‘आमचा या प्रस्तावाला विरोध असल्याने मुख्यमंत्री हा प्रस्ताव निकालात काढतील. येत्या २४ घंट्यांत हा प्रस्ताव निकालात काढला पाहिजे.’’
गांजा उत्पादन केल्यास त्यावर शासनाचे पूर्ण नियंत्रण असेल ! – दीपक प्रभू पाऊसकर
पणजी – औषधी वापरासाठी गोव्यात गांजाचे उत्पादन केल्यास त्यावर गोवा शासनाचे पूर्ण नियंत्रण असेल, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभू पाऊसकर यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘या प्रस्तावावर मंत्रीमंडळात चर्चा होईल. गांजाचा अमली पदार्थ म्हणून वापर करणे हे अवैध आहे; परंतु या अमली पदार्थावर नियंत्रण ठेवण्यास आमचे शासन सक्षम आहे.’’