पाकने क्षमा मागावी ! – आस्थापनाची मागणी

तुर्कस्तानी आस्थापनावर धाड टाकल्याचे प्रकरण

इस्लामाबाद (पाकिस्तान) – लाहोर शहरात तुर्कस्तानचे आस्थापन अल्बायर्क अँड ओज्पॅक ग्रुपच्या कार्यालयावर काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून धाड टाकण्यात आली होती. पोलिसांनी आस्थापनाच्या काही कर्मचार्‍यांना कह्यात घेऊन त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आस्थापनाचे प्रकल्प व्यवस्थापक केग्री ओजेल यांनी पाकिस्तान सरकारला या घटनेविषयी क्षमा मागण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. ‘क्षमा मागितली नाही, तर आमचे आस्थापन भविष्यात पाकमधील कुठल्याही लिलावामध्ये सहभागी होणार नाही’, अशी चेतावणी देण्यात आली आहे.

हे आस्थापन लाहोरमध्ये कचरा व्यवस्थापनाचे काम पहात आहे. पाक आणि तुर्कस्तान यांचे जवळचे संबंध असतांना अशा प्रकारची घटना घडल्याने दोन्ही देशांमध्ये यामुळे तणाव निर्माण झाला आहे.