नगर – रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही, त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्याशी संबंधित आणि कार्यालयीन सहकार्यांकडेही चौकशी चालू केली आहे. तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी येथील ज्येष्ठ अधिवक्ता तथा माजी अतिरित्त सरकारी अधिवक्ता सुरेश लगड यांनी केली आहे. पोलिसांच्या कह्यात असलेल्या त्यांच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठीही तज्ञांचे साहाय्य घेण्याचा पोलिसांचा विचार चालू आहे. बोठे यांच्याकडील परवाना असलेले शस्त्र पोलिसांनी पूर्वीच जप्त केले असून, आता त्यांचा शस्त्र परवाना कायमस्वरूपी रहित करण्याची प्रक्रिया पोलिसांनी चालू केल्याचे सांगण्यात आले.
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात लगड यांनी म्हटले आहे की, बोठे यांनी काही मासांपूर्वी प्रकाशित केलेल्या वृत्तमालिकेची चौकशी करण्यात यावी. ही मालिका कशाच्या अधारे प्रकाशित केली, त्यातून काय साध्य होणार होते, याची चौकशी केली जावी. तसेच अटकपूर्व जामीनासाठी त्यांच्याकडून उच्च न्यायालयात प्रयत्न केले जाऊ शकतात, तेथेही पोलिसांनी लक्ष ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली.