‘सांताक्लॉज’ या भ्रामक पात्राद्वारे मुलांना भूलथापा देणार्‍यांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत कारवाई व्हावी ! – हिंदूराष्ट्र सेना

  • हिंदूंच्या प्रथा-परंपरांच्या वेळी कोल्हाकुई करणारे पुरोगामी आणि अंनिसवाले याविषयी का बोलत नाहीत ? सातत्याने केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करणार्‍या या पुरोगाम्यांचा बेगडीपणा ओळखा !
  • ख्रिस्त्यांनी हिंदूंवर धर्मांतरासाठी इन्क्विजिशनसारखे क्रूर अत्याचार केले. अद्यापही अमिषे दाखवून धर्मांतर करून ख्रिस्ती हिंदूंवर एक प्रकारे आक्रमणच करत आहेत. अशा स्थितीत ख्रिस्त्यांच्या भ्रामक सांताक्लॉजचे हिंदूंकडून होणारे उदात्तीकरण थांबवण्यासाठी त्यांना धर्मशिक्षणच हवे !

मुंबई, २५ डिसेंबर (वार्ता.) – ‘ख्रिसमस’ सणाच्या निमित्ताने विविध ठिकाणी ‘सांताक्लॉज’ नामक विचित्र पात्र दाखवून लहान मुलांना खोट्या भूलथापा मारल्या जातात. अशा प्रकारे प्रलोभने दाखवून मुलांची फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदूराष्ट्र सेनेचे ठाणे शहर संघटक श्री. अमित गुजर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. (मुलांची फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात कारवाईची मागणी करणार्‍या हिंदुराष्ट्र सेनेचे अभिनंदन ! – संपादक) याची प्रत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही पाठवली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, सांताक्लॉज तुम्हाला चॉकलेट देईल, खेळणी देईल, तुम्हाला हवे ते देईल, अशी अनेक प्रलोभने दिली जातात. सार्वजनिक ठिकाणी शाळा, महाविद्यालये, ‘मॉल’ आदी ठिकाणी ‘सांताक्लॉज’चे कपडे घालून अंधश्रद्धा पसरवली जात आहे. यामुळे अनेक लहान मुले स्वत:च्या आई-वडिलांचा हात सोडून पळून जातात. काही ठिकाणी ‘सांताक्लॉज’चे कपडे घालून मुले पळवणार्‍या टोळ्याही कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. याविषयीच्या अनेक पोलीस ठाण्यांत तक्रारीही नोंद झाल्या आहेत. ‘सांताक्लॉज’नामक भ्रामक समजुतीमुळे समाजात अनिष्ट, अघोरी, अमानुष संस्कार देणार्‍या अपसमजुतींना उत्तेजन मिळत आहे. लाखो लहान मुलांच्या जिवांशी खेळणार्‍या या कृतींमुळे समाजात भीषण द्वेष, स्त्री-पुरुष असमानता, दारिद्य्र वाढत आहे. यांवर प्र्रतिबंध लावण्यासाठी महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी.