हुतात्मा सैनिक सुजित कीर्दत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

हुतात्मा सैनिक सुजित कीर्दत

सातारा – सिक्कीममध्ये भारत-चीन सीमेजवळ लष्करी वाहन दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये जिल्ह्यातील चिंचणेर-निंब गावातील सैनिक सुजित कीर्दत यांना वीर मरण प्राप्त झाले. त्यांचे पार्थिव २३ डिसेंबर या दिवशी चिंचणेर-निंब गावात आणण्यात आले. पोलीस दल आणि भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदूकीच्या फैरी झाडून आणि बिगुल वाजवून शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

या वेळी आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मीनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

लष्करी वाहनातून अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. मार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. चौका-चौकात श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. अंत्ययात्रेत अमर रहे, अमर रहे, सुजित कीर्दत, अमर रहे, भारतमाता की जय, अशा घोषणा देण्यात येत होत्या. या वेळी सहस्रोे ग्रामस्थ उपस्थित होते.