कलबुर्गी (कर्नाटक) – बसला एका मोठ्या अपघातातून वाचवणार्या श्री. यशवंतराव सूर्यवंशी यांना पेशवा विश्व माता फाऊंडेशनच्या वतीने नुकताच विश्व रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ३ जुलै २०२० या दिवशी कलबुर्गीहून शाहबादच्या दिशेने जाणारी बस एका पुलानजीक अपघातग्रस्त होणार होती. बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस दरीत कोसळण्याची भीती निर्माण झाली होती; परंतु श्री. सूर्यवंशी यांनी प्रसंगावधान राखून चालकासह चालत्या बसमधून उडी मारून बसच्या चाकांखाली मोठमोठे दगड घालण्यास प्रारंभ केला. त्यानंतर बस ३०० मीटर अंतरावर थांबली. त्यांच्या सतर्कतेमुळे तो अपघात टळला होता. पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांना यासाठी ‘विश्व रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. श्री. सूर्यवंशी हे कलबुर्गी अबकारी खात्याचे कर्मचारी आहेत, तसेच ते अखिल भारतीय मराठा जागृती मंचचे कर्नाटक राज्याचे प्रमुख आहेत. या कामगिरीसाठी कर्नाटक सरकारच्या वतीनेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ते अबकारी खात्याचे कर्मचारी असूनही युवकांमध्ये मद्यपानाच्या विरोधात जागृती करतात.
श्री. सूर्यवंशी यांनी यापूर्वी बेलगुंपा बोगोडी रस्ता दुर्घटनेत घायाळ झालेल्या लोकांना वेळीच रुग्णालयात पोचवण्याविषयी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या वेळी त्यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कारगिल युद्धाच्या वेळी त्यांनी पंतप्रधान साहाय्य निधीमध्ये अर्ध्या मासाचे वेतन पाठवले होते, तसेच केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे महापूर आला असता त्यातील पीडितांच्या साहाय्यासाठी ५ मासांचे वेतन अर्पण केले होते.