सातारा, १४ डिसेंबर (वार्ता.) – संगम माहुली येथील राजघाटावरील छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधीचा जीर्णोद्धार लोकसहभागातून करण्यात आला आहे. या समाधीचा लोकार्पण सोहळा १५ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता कृष्णा-वेण्णा या नद्यांच्या संगमावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी १३ डिसेंबर या दिवशी समाधी परिसराची पहाणी केली.
या वेळी सर्वश्री अजय जाधवराव, राजू राजपुरोहित, शशिकांत पवार, रोहित सावंत, विनित पाटील, पंकज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू, तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचे १५ डिसेंबर १७४९ या दिवशी सातारा शहरातील रंगमहाल-राजवाडा येथे निधन झाले. दक्षिण काशी समजल्या जाणार्या संगम माहुली येथील राजघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेच त्यांचे समाधीस्थळ उभारण्यात आले. राजमाता कल्पनाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर २०१८ मध्ये या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धाराचे काम लोकसहभागातून हाती घेण्यात आले. अवघ्या २५ मासांत हे काम पूर्ण करण्यात आले. १५ डिसेंबर २०२० या दिवशी छत्रपती शाहू (थोरले) महाराज यांची २७० वी पुण्यतिथी असून याच दिवशी सकाळी १० वाजता राजमाता कल्पनाराजेंच्या हस्ते समाधीचे लोकार्पण होणार आहे. तरी समस्त सातारावासियांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांना मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
संगम माहुली येथील राजघाटावर महाराणी ताराराणी आणि येसूबाई यांच्याही समाधी आहेत. या समाधींचाही जीर्णोद्धार करून त्यांचे लोकार्पण केले जाणार आहे. त्यासाठी आराखडा सिद्ध करून या समाधींचेही काम हाती घेतले जाणार आहे. याविषयी राजमातांनीही काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. |