भग्नावस्थेत असलेले चिंबल येथील ‘अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल चर्च’ वारसा स्थळ घोषित

भग्नावस्थेत असलेले चिंबल येथील अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल चर्च

पणजी, १३ डिसेंबर (वार्ता.) – गोवा शासनाने भग्नावस्थेत असलेले चिंबल येथील अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल चर्च (नोसा सेंनहोरा दो कार्मो) हे वारसा स्थळ घोषित केले आहे. या अनुषंगाने अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. (जुने गोवे येथील ‘इन्क्विझिशन’चा एकमेव पुरावा असलेला ‘हात कातरो’ खांब हीपण एक ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूला वारसा स्थळ घोषित करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ अनेक वर्षापासून करत आहेत. त्याचीही पुरातत्व खाते नोंद घेईल का ? – संपादक)

शहर आणि नगर नियोजन खात्याने ‘कन्झर्व्हेशन कमिटी’च्या शिफारसीवरून गतवर्षी चिंबल येथील चर्च वारसा स्थळ घोषित करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला होता. या अनुषंगाने लोकांकडून आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या; मात्र निर्धारित वेळेत कुणीही आक्षेप आणि सूचना कळवली नाही. यानंतर शहर आणि नगर नियोजन खात्याने राज्यातील ‘बिल्डींग्स अँड सायट्स ऑफ हिस्टॉरिक अँड अस्थेटिक इंपॉर्टन्स’च्या सूचीमध्ये दुरुस्ती करून चिंबल चर्च वारसा स्थळाच्या सूचीत समाविष्ट करण्यात आले आहे.

चिंबल येथील चर्चचा इतिहास

हे चर्च आणि ‘काँन्व्हेंट ऑफ अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल’ हे १७ व्या शतकात बांधले होते. हे चर्च म्हणजे ब्राह्मण नसलेल्या गोमंतकियांच्या पोर्तुगीजविरोधी लढ्याचे एक प्रतिक असल्याचे म्हटले जाते. हे चर्च सध्या भग्नावस्थेत आहे. वर्ष १८३५ पर्यंत या भूमीची मालकी ‘टर्टस्टरी कार्मेलिटीस’ यांच्याकडे होती. वर्ष १८३५ मध्ये ‘टर्टस्टरी कार्मेलिटीस’कडून ही भूमी हिरावून घेऊन ती ‘सांता कासा डा मिसनरीकोर्दिया’ यांना देण्यात आली. यानंतर १९३० मध्ये ही भूमी निराधार महिला आणि युवती यांच्यासाठी निर्धारित करण्यात आली. या ठिकाणी वर्ष १९३० मध्ये गोव्यातील पहिले मनोरुग्णालय चालू करण्यात आले. हे चर्च २ सहस्र ५०० चौ.मी. भूमीत आहे आणि चर्चची इमारत आता भग्नावस्थेत आहे. वारसा स्थळ घोषित केल्यामुळे व्यावसायिक स्तरावर या वास्तूचे जतन केले जाणार आहे.