आळंदीतील संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळा साधेपणाने आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार

पुणे – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आळंदी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये संचारबंदी कायम आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळा साधेपणाने आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. राज्यभरातून येणार्‍या अनुमाने साडेतीनशेहून अधिक दिंड्या आणि पंढरपूर, तसेच विविध ठिकाणांहून येणार्‍या पालख्या आळंदीत आलेल्या नाहीत. सोहळ्यात सहभागी होता येणार नसल्याची खंत वारकर्‍यांच्या मनामध्ये आहे.

परंपरेनुसार अष्टमीपासून नैमित्तिक कार्यक्रम साजरे केले जात आहेत. ज्यांचे कीर्तन आणि जागर होणार आहेत, त्यांच्या वैद्यकीय पडताळणीसाठी विशेष वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांवर बंदीचे फलक लावण्यात आले आहेत. इंद्रायणी घाटावर पोलीस बंदोबस्त असून, पाचपेक्षा अधिक व्यक्तींची गर्दी दिसल्यावर कारवाईची चेतावणी देण्यात येत आहे.