मुंबई – मुंबई विमानतळावर उतरणारे काही प्रवासी कोरोनाची चाचणी करण्यास नकार देत असून संबंधित अधिकार्यांसमवेत वाद घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे असहकार्य करणार्या प्रवाशांवर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी दिली. ५ डिसेंबर या दिवशी सौ. किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची पहाणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना ही माहिती दिली.
या वेळी सौ. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘‘कोरोना चाचणीच्या वेळी प्रवाशांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे. प्रवास चालू करण्यापूर्वीच कोरोना चाचणी करून मुंबईत येणार्या प्रवाशांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. बाधित प्रवाशांमुळे मुंबईकरांना संसर्ग होऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे.’’