अभ्दिमंडी (जिल्हा संभाजीनगर) येथील गुरुमूर्ती पू. आप्पा लिंभारे (वय ७५ वर्षे) यांचा देहत्याग !

गुरुमूर्ती पू. आप्पा लिंभारे

अभ्दिमंडी (जिल्हा संभाजीनगर) – येथील शिवभक्त गुरुमूर्ती पू. आप्पा लिंभारे (वय ७५ वर्षे) यांनी ३ डिसेंबर या दिवशी देहत्याग केला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार लिंभारे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

सनातन संस्थेच्या वतीने २३.८.२०१४ या दिवशी सनातनच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. त्या वेळी त्यांना सनातन-निर्मित दत्ताच्या चित्राची प्रतिमा आणि भेटवस्तू देण्यात आली होती. पू. आप्पा लिंभारे यांच्यातील संतत्वाचे पैलू श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी उलगडले.

गुरुमूर्ती पू. आप्पा लिंभारे यांचा अल्प परिचय

पू. आप्पा लिंभारे यांना १२ वर्षांपूर्वी दत्तगुरूंनी दृष्टांत दिला. पू. आप्पा एखाद्याची नाडी पाहून औषध द्यायचे आणि आजार बरा करायचे. त्यांना अनेक आयुर्वेदीय औषधांविषयी माहिती होती. व्यक्तीचा तोंडवळा पाहून ते भविष्य सांगायचे.

‘सर्व गुरु महाराजांच्या आशीर्वादाने घडते’, असा भाव असणारे पू. आप्पा !

‘सन्मान सोहळ्याच्या वेळी पू. आप्पा म्हणाले होते, ‘‘मी पूर्ण भारतात चारही धाम फिरलो. यासाठी ४ मास (महिने) लागले. सर्व गुरु महाराजांच्या आशीर्वादाने घडते, घडणार आणि आजही घडते. गुरु म्हणजे दत्तगुरु. समोर एखादे मोठे संकट आले, तर ‘आपोआप कसे घडते ?’ हे कळत नाही. त्याचे निवारण होऊन जाते. आता जे आध्यात्मिक त्रास आहेत, ते मानवाने पूर्वी केलेल्या कर्माचे फळ आहे. कलियुगात आल्यानंतर त्याचे भोग त्याला भोगावे लागतात. आता आपण लोकांचे चांगले केले, तर त्याचे फळ आपल्याला पुढच्या जन्मानंतर मिळते. कलियुगात संसारात राहून साधना केल्याने लवकर फलप्राप्ती होते; कारण तो त्याचे व्यवहार पूर्ण करून देवाची आराधना करतो; म्हणून त्याला फलप्राप्ती लवकर होते.’’