धुळे विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपचे अमरीशभाई पटेल विजयी

महाविकास आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटली

अमरीशभाई पटेल

धुळे, ३ डिसेंबर (वार्ता.) – धुळे विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपचे अमरीशभाई पटेल विजयी झाले आहेत. पटेल हे माजी शालेय शिक्षणमंत्री आहेत. निवडणुकीत ४३७ पैकी ४३४ जणांनी मतदान केले होते. यात भाजपचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांना ३३२, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली. ४ मते बाद झाली. या मतदारसंघात भाजपचे १९९ नगरसेवक, तर काँग्रेसचे १५७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६, शिवसेनेचे २० नगरसेवक मिळून महाविकास आघाडीचे २१३ आणि अन्य मतदार होते. २१३ मते असतांना महाविकास आघाडीच्या उमेदवारास ९८ मते पडल्याने मोठ्या प्रमाणात त्यांची मते फुटल्याचे स्पष्ट आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पटेल यांनी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व आणि विधान परिषदेचे सदस्यत्व अशा दोन्हींचे त्यागपत्र देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.