अजानची स्पर्धा सार्वजनिकरित्या आयोजित करण्यास मी विरोध दर्शवला ! – पांडुरंग सकपाळ, विभागप्रमुख, शिवसेना

मुंबई – मुंबादेवी विधानसभेतील ‘फाऊंडेशन फॉर यू’ नावाच्या संस्थेने अजानची सार्वजनिकरित्या स्पर्धा आयोजित केली होती. मी त्यांना कोरोनाविषयक नियम अवगत करून देत स्पर्धा सार्वजनिकरित्या आयोजित करण्यास विरोध दर्शवला, असे स्पष्टीकरण दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केले.

सकपाळ यांनी अजानविषयी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाल्यावर अनेक वृत्तपत्रांमध्ये सकपाळ यांनी अजान स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. यावरून विरोधी पक्ष भाजपकडून शिवसेनेवर हिंदुत्वाच्या सूत्रावरून टीका करण्यात आली. याविषयी पांडुरंग सकपाळ यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे. याविषयी पांडुरंग सकपाळ म्हणाले, ‘‘शेवटचा पर्याय म्हणून ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यास मी सुचवले आणि शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारच्या शुभेच्छा देतांना माझ्या मनात कोणत्याही प्रकारे धार्मिक अथवा राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे या गोष्टीचे वेगळ्या अर्थाने राजकारण करण्यात येऊ नये.’’

आता रस्त्यावर सामूहिक नमाज स्पर्धेचेही आयोजन करा ! – आमदार अतुल भातखळकर, भाजप

मुंबई, १ डिसेंबर (वार्ता.) – मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याचे काम हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच केले नाही. ओवैसीलाही लाज वाटेल, असे हे लांगूलचालन आहे. लहान मुलांसाठी अजान स्पर्धेनंतर आता रस्त्यावर सामूहिक नमाज स्पर्धेचेही आयोजन करा, अशी उपरोधिक टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुसलमान मुलांना अजानची गोडी लागावी, यासाठी शिवसेना नमाजपठण स्पर्धेचे आयोजन करणार असल्याच्या केलेल्या वक्तव्यावरून आमदार भातखळकर यांनी हे ‘ट्वीट’ केले आहे.