कोल्हापूरच्या गिर्यारोहकांचे लिंगाणा सुळक्यावर यशस्वी आरोहण !

लिंगाणार्‍यावर चढाई करतांना गिर्यारोहक

कोल्हापूर, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – स्वराज्याची राजधानी रायगड आणि स्वराज्याचे तोरण, म्हणजेच तोरणागड यांच्यामध्ये ३ सहस्र १०० फूट उंचीच्या शिवलिंगाच्या आकाराचा असलेला अतीदुर्गम असा कातळकडा म्हणजेच गिरीदुर्ग लिंगाणा होय ! हा गड नुकताच कोल्हापूरच्या गिर्यारोहकांनी यशस्वीरित्या सर केला.

या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री. प्रमोद पाटील म्हणाले,

१. प्रत्येक वर्षी खंडेनवमीच्या दिवशी गिर्यारोहणाच्या साहित्याचे पूजन करून गिर्यारोहणास प्रारंभ केला जातो. यंदा कोरोनामुळे याचा प्रारंभ नोव्हेंबरमध्ये करण्यात आला.

२.२० नोव्हेंबरला हिल रायडर्सच्या बसमधून २५ जणांचा चमू मोहरीकडे मार्गस्थ झाला. दिवस उजाडता उजाडता गिर्यारोहण साहित्य, वैयक्तिक आणि जेवणाचे साहित्य पाठीवर घेऊन सर्व चमू लिंगाण्याकडे जाण्यास निघाला.

लिंगाणा सर केल्यावर एकत्र जमलेले गिर्यारोहक

३. लिंगाण्याची चढाई दोन टप्प्यांत विभागली जाते. पहिला कोलमधून सुळक्याच्या पायथ्यापर्यंत आणि दुसरा सुळक्याचा पायथा ते माथा. पहिला टप्पा हा साधारण ६०० फुटांचा आहे. या ६०० फुटांमध्ये चढाई करतांना एकूण ५ टप्पे पार करावे लागतात.

४. २२ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता १२ वर्षांचा बाल गिर्यारोहक कु. कार्तिक कवतिके याने सर्वप्रथम लिंगाण्याचा माथा गाठला आणि त्यापाठोपाठ सर्वांनी लिंगाण्यावर यशस्वी आरोहण केले. माथ्यावरुन पूर्वेला राजगड, तोरणा आणि पश्‍चिमेला रायगड, जगदिश्‍वर मंदिर अन् राजांची समाधी दृष्टीपथात येत होती. तेथूनच सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा केला. यानंतर रात्रीपर्यंत सर्व जण खाली उतरले आणि नंतर कोल्हापूर येथे परत आले.

५. मोहिमेमध्ये हिल रायडर्स अँड हायकर्स, समीट ऍडव्हेंचर, वेस्टर्न माउंटन स्पोर्ट्स, ऍडव्हेंचर गियर, व्हरटाईस् ऍडव्हेंचर आणि कोल्हापूर मॉनिटरिंग अँड ऍडव्हेंचर फाऊंडेशन या संस्थांचे सदस्य सहभागी झाले होते. या मोहिमेस ज्येष्ठ गिर्यारोहक प्रमोद पाटील, विनोद कांबोज आणि ऋषीकेश केसकर यांनी मार्गदर्शन केले. या मोहिमेत वद्यानंद बेडेकर, राहुल कदम, अभय मोरे, प्रदीप कवविके, कार्तिक कवतिके, अथर्व कवतिके, राजेश माने, नितेश सातार्डेकर, महेश भंडारे, अनिकेत महाजन, सतीश यादव यांच्यासह अन्य गिर्यारोहकांनी सहभाग घेतला.