श्री जोतिबा डोंगरावर कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने लाखाहून अधिक भाविक

जोतिबा देवाची सालंकृत पूजा

कोल्हापूर, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – कार्तिक पौर्णिमेनिमित्त पन्हाळा तालुक्यातील श्री जोतिबा डोंगरावर श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक येथून लाखाहून अधिक भाविक आले होते. यामुळे डोंगरावर यात्रेचेच स्वरूप प्राप्त झाले होते. ‘चांगभल’च्या घोषणेने डोंगर दणाणून गेला.

सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ सायंकाळी ७ या वेळेत मुख्य मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येत होते. नियम आणि अटी यांनुसार केवळ १० सहस्र भाविकांनाच रांगेतून दर्शन मिळाले. अन्य भाविकांना कळस आणि मुख दर्शन यांवर समाधान मानावे लागले. भाविकांना दर्शन घेण्यासाठी देवस्थान समितीने परिसरात ‘एल्.ई.डी.’ची सोय केली होती. आठ मासांनंतर डोंगर आज भाविकांनी फुलून गेला. दिवसभर भाविक येत होते. पाद्यपूजा, काकड आरती, मुखमार्जन यानंतर मंगलपाठ झाला. सकाळी जोतिबा देवाची सालंकृत पूजा बांधण्यात आली होती.