कोरोनाशी संबंधित अहवाल येण्यापूर्वीच माणगाव हायस्कूल चालू केल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचे आरोग्य धोक्यात 

  • युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी आणि पालक यांचा आरोप

  • मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर कारवाई करण्याची मागणी !

कुडाळ – शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा कोरोनाशी संबंधित अहवाल येण्यापूर्वीच मुख्याध्यापक आणि संस्था प्रशासन यांनी माणगाव हायस्कूल चालू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या जिवाला धोका निर्माण करणारे माणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि संस्था प्रशासन यांच्यावर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, कुडाळ तहसीलदार, पोलीस प्रशासन अन् जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कडक कारवाई करावी आणि शाळेला तात्काळ टाळे लावावे, अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी यांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर २८ नोव्हेंबरला पालकांनी शाळेत धडक देत मुख्याध्यापक प्रशांत धोंड आणि संस्था प्रशासन समिती यांना खडसावले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोनाशी संबंधित तपासणी करावी आणि त्याचा अहवाल आल्यावर शाळा चालू करावी, असे आदेश शासनाने दिले होते; मात्र माणगाव हायस्कूलचे मुख्याधापक प्रशांत धोंड यांनी शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी यांचा अहवाल मिळण्यापूर्वीच शाळा चालू करण्याचा निर्णय घेतला आणि २३ नोव्हेंबरपासून शाळा चालू केली. (दायित्वशून्य मुख्याध्यापक ! कोरोना महामारीचा संसर्ग महाराष्ट्रात वाढला असतांना असे दायित्वशून्यतेने वागणार्‍यांवर कारवाईच व्हायला हवी ! – संपादक) यानंतर एका शिक्षकाचा अहवाल २६ नोव्हेंबरला सकारात्मक आला. हे शिक्षक ४ दिवस शाळेत आले आणि त्यांनी वर्गात जाऊन मुलांना शिकवलेही; मात्र त्यांचा अहवाल सकारात्मक आल्याची माहिती मुख्याध्यापकांनी शिक्षक अन् पालक यांच्यापासून लपवून ठेवली. २७ नोव्हेंबरला अचानक विद्यार्थी वर्गाच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुपवर २८ नोव्हेंबर, २९ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर आणि मंगळवार १ डिसेंबर (१ डिसेंबर या दिवशी माणगाव जत्रोत्सवाची), असे ४ दिवस सुटी घोषित केल्याचा संदेश आला. या संदेशामुळे पालकांना ‘त्या’ शिक्षकाची कोरोनाची चाचणी सकारात्मक आल्याची कुणकुण लागली. त्यामुळे योगेश धुरी यांच्यासह एका शिष्टमंडळाने शाळेत जाऊन संबंधितांना खडसावले. या वेळी शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सर्वांची कोरोनाची तपासणी करावी अन्यथा माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना घेराव घालू, अशी चेतावणी धुरी यांनी दिली.