देवतेला भावपूर्ण नैवेद्य दाखवून तो ‘प्रसाद’ या भावाने ग्रहण केल्याने व्यक्तीला होणारा आध्यात्मिक लाभ !

आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘हिंदु धर्मात देवतेला नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. ‘देवतेला नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून ग्रहण करणार्‍यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली अन् ६६ टक्के पातळीची साधिका, आध्यात्मिक त्रास नसलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला अन् ६१ टक्के पातळीचा साधक असे एकूण ४ जण सहभागी झाले होते.

या चाचणीतील साजूक तुपातील गोड शिर्‍याचे दोन भाग करण्यात आले. यातील पहिल्या भागाचा श्री सिद्धिविनायक देवाला नैवेद्य दाखवण्यात आला. याला या लेखात ‘प्रसादाचा शिरा’ असे संबोधले आहे. दुसर्‍या भागाचा देवाला नैवेद्य दाखवलेला नाही. याला ‘नेहमीचा गोड शिरा’ असे संबोधले आहे. या दोन्ही शिर्‍यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. साधकांनी प्रथम प्रसादाचा शिरा ग्रहण केला. त्यानंतर दुपारी न्याहारीच्या वेळी त्यांनी नेहमीचा गोड शिरा ग्रहण केला. साधकांनी दोन्ही प्रकारचा शिरा ग्रहण करण्यापूर्वी आणि ग्रहण केल्यानंतर २० मिनिटांनी त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर ‘नेहमीचा गोड शिरा अन् प्रसादाचा शिरा ग्रहण केल्याने साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे समजले. ते पुढे दिले आहे.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण – नेहमीच्या गोड शिर्‍याच्या तुलनेत प्रसादाचा शिरा ग्रहण केल्याने साधकांवर पुष्कळ अधिक सकारात्मक परिणाम होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून स्पष्ट होते.

टीप – ‘ऑरा स्कॅनर’ने ९० अंशाचा कोन केला. ‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.

सौ. मधुरा कर्वे

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. नेहमीच्या गोड शिर्‍यापेक्षा प्रसादाच्या शिर्‍यामध्ये पुष्कळ अधिक सकारात्मक ऊर्जा आहे.

२. साधकांनी नेहमीचा गोड शिरा ग्रहण केल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा थोडी न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा थोडी वाढली.

३. साधकांनी प्रसादाचा शिरा ग्रहण केल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

२. निष्कर्ष

नेहमीच्या गोड शिर्‍याच्या तुलनेत प्रसादाचा शिरा ग्रहण केल्याने साधकांवर पुष्कळ अधिक सकारात्मक परिणाम झाला.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. नेहमीच्या गोड शिर्‍यापेक्षा प्रसादाच्या शिर्‍यामध्ये पुष्कळ अधिक सकारात्मक ऊर्जा असण्याचे कारण : देवाला नैवेद्य भावपूर्ण अर्पण केल्यास देवाकडून येणारे चैतन्य नैवेद्यामध्ये आकृष्ट होते. त्यामुळे तो सर्वसाधारण पदार्थ न रहाता ‘चैतन्यमय प्रसाद’ बनतो. देवाचा चैतन्यमय प्रसाद ग्रहण करणार्‍याला त्याच्या भावानुसार आध्यात्मिक लाभ होतो. चाचणीतील गोड शिर्‍याच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २.९० मीटर, तर प्रसादाच्या शिर्‍याची ८.२५ मीटर आहे, म्हणजे पुष्कळ अधिक आहे. याचे कारण हे की, गोड शिर्‍याचा श्री सिद्धिविनायक देवाला भावपूर्ण नैवेद्य दाखवल्याने त्यामध्ये देवाचे चैतन्य आकृष्ट झाले.

३ आ. साधकांनी प्रसादाच्या शिर्‍यातील चैतन्य त्यांच्या भावानुसार ग्रहण करणे : नेहमीच्या गोड शिर्‍याच्या तुलनेत प्रसादाचा शिरा ग्रहण केल्याने चाचणीतील साधकातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून किंवा नाहीशी होऊन त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. याचे कारण हे की, देवाला भावपूर्ण नैवेद्य दाखवून मग तो पदार्थ ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करतो, तेव्हा त्यातून मिळणारा लाभ अनेक पटींनी वृद्धींगत होतो. तसेच प्रसाद ग्रहण करणार्‍याच्या भावाप्रमाणे त्याला प्रसादातील चैतन्य ग्रहण होते.

हिंदु धर्मात देवाला नैवेद्य भावपूर्ण अर्पण करून मग ते ग्रहण करण्यास सांगितले आहे. जीवनातील प्रत्येक लहान-सहान कृतीतून मानवाला आध्यात्मिक लाभ मिळावा, यासाठी हिंदु धर्माने किती सखोल विचार केला आहे, हे यातून लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१८.११.२०२०)

ई-मेल : [email protected]

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक