नवी मुंबईत चाचणी न केलेल्या व्यक्तींचे कोरोना अहवाल दिले !

नवी मुंबई – नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील महापालिकेच्या कोरोनाच्या पडताळणी केंद्रात कोरोनाची पडताळणी न केलेल्यांच्या कुटुंबियांचे कोरोनाचे अहवाल देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

तुर्भे येथील बाजार समितीमध्ये नवी मुंबई महापालिकेने कोरोनाचे पडताळणी केंद्र चालू केले आहे. या केंद्रात पडताळणी करणार्‍या व्यक्तीकडून कुटुंबियांची नावे नोंद करून घेण्यात येत होती. नंतर पडताळणी केलेल्या व्यक्तीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ दिल्यावर दोन दिवसांनी कोरोनाची पडताळणी न केलेल्या त्याच्या कुटुंबियांचा पडताळणी अहवाल ‘निगेटिव्ह’ असल्याचे सांगण्यात आले. अशी अनेक प्रकरणे घडली आहेत.

याहून अधिक कहर म्हणजे काही वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचाही कोरोनाचा पडताळणी अहवाल देण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.