पुणे – गेल्या काही दिवसांमध्ये शहरासह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, या दृष्टीने राज्य सरकारने देहली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या ४ राज्यांतून येणार्या नागरिकांसाठी कोरोनाची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी ‘निगेटिव्ह’ असल्याचा अहवाल बंधनकारक केला आहे. त्यामुळे विमान, तसेच रेल्वेने येणार्या अशा प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचार्यांची नेमणूक केली जाणार असून २५ नोव्हेंबरपासून लोहगाव विमानतळ आणि रेल्वे स्थानक येथे बाहेरून येणार्या प्रवाशांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी केली जाणार आहे.
विमानतळ आणि रेल्वेप्रमाणेच खासगी प्रवासी बसमधूनही अनेक नागरिक पुण्यात येत असतात. आंतरराज्य खासगी प्रवासी बस वाहतुकीतून येणार्या प्रवाशांची तपासणी कशी करायची, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्याचसमवेत राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) स्वारगेट आणि शिवाजीनगर स्थानकांवरही परराज्यांतून येणार्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्यांनी दिली.