पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता !

पुणे – दिवाळीमुळे खरेदी साठी मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी आणि हिवाळा यांमुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २४ नोव्हेंबर या दिवशी पुणे जिल्ह्यात एकूण ८३७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे शहरातील ४१६ जणांचा समावेश आहे.

२३ नोव्हेंबर या दिवशी एकूण रुग्णांची हीच संख्या ५२५ होती. दिवसभरात ९ सहस्र ४१० कोरोना चाचण्या केल्या गेल्या, तर दिवसभरात ४६८ जण कोरोनामुक्त झाले आणि १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण २.८१ टक्के आहे, तर बर्‍या होणार्‍या रुग्णांचे प्रमाण ९४.५३ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ४ सहस्र १८४ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ६ सहस्र १९८ रुग्णांवर घरातच उपचार करण्यात येत आहेत.