वैद्यकीय अधिकारी वेळेत येत नसल्याने रुग्णांची असुविधा होत असल्याचा आरोप
अशा दायित्वशून्य वैद्यकीय अधिकार्यांवर कठोर कारवाई करायला हवी !
सावंतवाडी – नगरपालिकेच्या भगवान महावीर आयुर्वेदिक आणि क्षयरोग (टीबी) चिकित्सालयाचे वैद्यकीय अधिकारी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहात नसल्याने रुग्णांची होणारी असुविधा लक्षात घेऊन नगराध्यक्ष संजू परब यांनी २३ नोव्हेंबरला चिकित्सालयाला टाळे ठोकले. अखेर २ घंट्यांनंतर चिकित्सालय पुन्हा चालू करण्यात आले.
सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहाच्या बाहेर नगरपालिकेच्या माध्यमातून भगवान महावीर आयुर्वेदिक आणि क्षयरोग चिकित्सालय चालू आहे. या चिकित्सालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. उमेश मसुरकर आणि अन्य २ कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कार्यालयीन वेळेनुसार सकाळी ९.३० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५.४५ या वेळेत चिकित्सालय चालू असते; मात्र गेले काही दिवस डॉ. उमेश मसुरकर वेळेत चिकित्सालयात उपस्थित रहात नसल्याविषयी अनेकांच्या तक्रारी नगरपालिकेकडे आल्या होत्या.
त्यामुळे अखेर २३ नोव्हेंबरला नगराध्यक्ष परब यांनी सकाळी ९.३० वाजता प्रत्यक्षात चिकित्सालयाला भेट देत पहाणी केली. या वेळी डॉ. मसुरकर वेळेत उपस्थित नसल्याने रुग्ण ताटकळत असल्याचे निदर्शनास आले. (असे दायित्वशून्य वैद्यकीय अधिकारी काय कामाचे ? – संपादक) त्यामुळे परब यांनी चिकित्सालयाला टाळे ठोकत त्याची चावी थेट मुख्याधिकार्यांकडे नेऊन दिली, तसेच यावर त्वरित कारवाई करावी, असे सुचवले. त्यानंतर मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी दिलेल्या सूचनेनंतर तब्बल २ घंट्यांनंतर चिकित्सालय पुन्हा उघडण्यात आले.