डिसेंबरपासून गोवा शासन मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करणार : १० सहस्रांहून अधिक रिक्त पदे भरणार

पणजी, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – गोवा शासन डिसेंबर मासापासून मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करणार आहे. शासनाच्या विविध खात्यांमधील सुमारे १० सहस्रांहून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात नोकरभरती आणि विकास प्रकल्प यांवर निर्बंध लादण्यात आले होते. हे निर्बंध ३० नोव्हेंबरला उठवले जाणार आहेत. त्यामुळे १ डिसेंबरपासून नोकरभरतीसह विकासकामांचाही मार्ग मोकळा होणार आहे.

याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘नोकरभरतीसंबंधी निर्बंध उठवल्यानंतर शासकीय कार्यालयांत सुमारे १० सहस्र कर्मचार्‍यांची पदे भरली जाण्याची शक्यता आहे. या रिक्त पदांसाठी लवकरच विज्ञापन दिले जाणार आहे. कोरोना महामारीच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती खालावल्यानंतर मार्च मासात शासनाने नोकरभरती आणि विकास प्रकल्प यांवर निर्बंध लादले होते. शासनाची आर्थिक स्थिती आता सुधारत आहे. १ डिसेंबरपासून आता कसलेच निर्बंध असणार नाहीत. राज्य कर्मचारी भरती आयोगावर मोठ्या नोकरभरतीचा ताण येतो. त्यामुळे आयोगाचा ‘ना हरकत दाखला’ घेऊन काही खात्यांतील भरती खात्यांतर्गत करण्यात येणार आहे.’’

राजकीय निरीक्षकांच्या मते लवकरच होणार्‍या जिल्हा पंचायत, नगरपालिका आणि विधानसभा यांच्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात येणारी नोकरीभरती शासनाला लाभदायक ठरू शकते.

‘पक्ष कार्यकर्त्यांनाच नोकरी मिळणार’, ही आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या नावाची ध्वनीफीत सामाजिक माध्यमांत प्रसारित

‘पक्ष आणि माझ्यासाठी कार्य करणार्‍या युवा कार्यकर्त्यालाच विविध खात्यांतर्गत करण्यात येणार्‍या नोकरभरतीचा लाभ मिळणार आहे. राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या शिफारसीविना ही नियुक्ती करण्यात येणार आहे आणि यासाठी ‘आय.ए.एस्.’ अधिकारी काहीच करू शकणार नाहीत’, असे विधान असणारी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या नावाची ध्वनीफित सामाजिक माध्यमांत प्रसारित झाली; मात्र याविषयी आरोग्यमंत्री राणे यांच्याकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.