पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – १८ नोव्हेंबरपासून श्री विठ्ठलाचे दिवसभरात २ सहस्र भाविकांना ऑनलाईन बुकिंग करून मुखदर्शन घेता येणार आहे. भाविकांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन मंदिर समितीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
शासनाच्या निर्देशानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून भाविकांना पदस्पर्श दर्शन न देता मुखदर्शन चालू करण्यात आले आहे. मंदिरे खुली करण्यात आल्यापासून सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत प्रत्येक घंट्याला १ सहस्र भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येत होते. आता त्यात दुपटीने वाढ करण्यात येणार आहे. मंदिरात प्रवेश करतांना प्रत्येक भाविकाचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत असून हात सॅनिटायझ करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. www.vitthalrukminimandir.org/home.html या मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करता येते.