मुंबईत फटाकेबंदी कागदावरच

मुंबई – दीपावलीच्या दिवसात मुंबईमध्ये पहाटेपर्यंत फटाके फोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी फटाकेबंदी केवळ कागदावरच राहिली. गेल्या ४ वर्षांचा आढावा घेता तुलनेने ध्वनीप्रदूषण अल्प असले, तरी आवाजी फटाके फोडू नयेत, या आवाहनाला नागरिकांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. सफर संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार वायू प्रदूषणामध्ये वर्ष २०१७ पासूनच्या दिवाळीपेक्षा घट होती.

जुहू येथील ७२ वर्षीय नागरिक प्रकाश चौधरी यांनी गंगाधर पिलाजी चौधरी मार्ग येथे सायंकाळी ७ वाजल्यापासून ११.३० वाजेपर्यंत आवाजी आणि वायू प्रदूषण करणारे फटाके सातत्याने फुटत असल्याचे सांगितले. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला २७ वेळा दूरभाष केला; मात्र फटाक्यांवर कुठलेही नियंत्रण आले नाही. रात्री ११.३० नंतर ‘जुहूच्या एका परिसरामध्ये आवाजी फटाक्यांमुळे त्रास जाणवत होता’, अशी माहिती त्यांनी दिली. अनेक ठिकाणी नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फटाके न फोडण्याच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला असला, तरी काही ठिकाणी मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागला.