या प्रेमाला उपमा नाही । हे देवाघरचे लेणे । जे कधी कुणी ना दिधले । ते तू प्रेम मज दिधले ॥
‘गुरुविना शिष्य नाही आणि शिष्याविना गुरु नाही’, अशी एक म्हण आहे. ‘शिष्याचे जीवन आनंदी असणे’, यातच गुरूंचा आनंद असतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेही तसेच आहे. सनातनच्या प्रत्येक साधकाने संकटकाळी त्यांच्या प्रीतीचा आणि कृपेचा स्पर्श अनुभवला आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक आपल्याला शारीरिक अन् मानसिक स्तरांवर त्यांच्या क्षमतेनुसार साहाय्य करतील; पण त्याच्या पुढेे ते काही करू शकत नाहीत; परंतु ‘गुरु त्यांच्या शिष्यांना आणि साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा सर्व प्रकारच्या पिडांतून मुक्त करतात’, याची प्रचीती सनातनचे साधक घेत आहेत.
वास्तविक साधकाने गुरूंची सेवा करायची असते. कर्ते-करविते श्रीगुरुच असले, तरी स्थुलातून का असेना त्यांची सर्वतोपरी काळजी घ्यायची असते. परात्पर गुरु डॉक्टर इतके साधकवत्सल आहेत की, तेच अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही साधकांच्या आवडी-निवडींचा विचार करून आठवणीने साधकांसाठी सतत काहीतरी करत असतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रीतीची साधक कशा प्रकारे अनुभूती घेतात, हे काही प्रसंगांवरून लक्षात येईल !
संकलन : कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (५.५.२०२०)
केवळ जन्मापासून नव्हे, तर जन्मापूर्वीपासून ते मृत्यूनंतरही साधकाचा योगक्षेम वहाणारी, जन्मोजन्म त्यांचा प्रतिपाळ करणारी गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘आपत्काळ येण्यापूर्वी पृथ्वीवरील अनेक संत देहत्याग करतील. मी मात्र तुम्हा साधकांसमवेत शेवटपर्यंत, म्हणजे संपत्काळ येईपर्यंत (हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत) असेन.’
– परात्पर गुरु डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांच्यात असलेले अतूट नाते !
- एका प्रसंगी एक साधिका तिला पडलेले स्वप्न परात्पर गुरु डॉक्टरांना सांगत होती. त्या स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टर तिला सोडून गेल्याचे तिला दिसले. तिचे ते वाक्य सांगून पूर्ण होण्यापूर्वीच परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘मी माझ्या साधकांना कधीच सोडून जात नाही.’’ नंतर संवाद पूर्ण होईपर्यंत त्यांनी हेच वाक्य २-३ वेळा उच्चारले.
- एकदा आश्रमात आलेल्या एका संतांना निरोप देऊन परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या निवासकक्षाकडे निघाले होते. तेव्हा मार्गिकेतील काही साधकांनी त्यांना हात हलवून ‘टाटा’ केला. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘निरोप कसला माझा घेता । जेथे साधक तेथे मी आता ॥’
- परात्पर गुरुदेवांसाठी साधकच सर्वस्व आहेत. ‘मला सर्व फुलांत ‘साधक फूल’ सर्वांत प्रिय आहे’, असे त्यांनी एकदा म्हटले होते.
- ‘तुम्हा सर्व साधकांचे आणि तुमच्या कुटुंबाचेही दायित्व माझ्यावर आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (सावंतवाडी येथील मंदिरात साधकांना केलेले मार्गदर्शन)
खरेच, ‘साधकांसाठी किती करू नी काय काय करू’, असे त्यांना वाटत असते. त्यांनी साधकांचा हात सोडण्यासाठी नाही, तर जन्मोजन्मी साथ देण्यासाठी, मोक्षप्राप्तीपर्यंत वाटचाल करण्यासाठीच धरला आहे !
१. सर्व स्तरांतील, सर्व वयोगटांतील साधकांवर कृपाछत्र असणे
‘परात्पर गुरु डॉक्टरांचे गरीब – श्रीमंत, शिक्षित – अशिक्षित, लहान – मोठे आदी सर्व साधकांवर कृपाछत्र आहे. हे मी स्वतः अनुभवले आहे. प्रत्येकाला ते आवश्यकतेप्रमाणे साहाय्य करतात. त्यांना आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय सांगतात. त्यांच्या कृपाछत्राखाली वावरणारा साधक नेहमीच आनंदी असतो.’ – श्री. प्रकाश रा. मराठे, रामनाथी, गोवा.
२. साधकांचे आनंदाचे क्षण साजरे करणे
२ अ. साधिकेच्या आश्रमातील पहिल्या वाढदिवसाला तिला हवी त्या प्रकारची साडी देणे : ‘आश्रमातील कु. कनकमहालक्ष्मी देवकर हिला साडी नेसायला आवडते; परंतु तिच्याकडे साडी नव्हती. हे परम पूज्यांना कळल्यावर त्यांनी तिला साडी देण्याविषयी लगेच साधिकांना सांगितले. काही दिवसांनी तिचा आश्रमात पहिल्यांदाच वाढदिवस साजरा होणार होता.
तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘आज कनकमहालक्ष्मीचा वाढदिवस आहे ना ! तिला आपण आज साडी भेट देऊया. तिच्याजवळ साडी नाही ना ! तिला जो रंग आवडतो, त्या रंगाची साडी तिला निवडून घेता येईल. आश्रमातील पहिल्या वाढदिवसाला (तिला) पहिली साडी मिळेल !’’ – कु. वैभवी सुनील भोवर (वय १६ वर्षे) (२३.६.२०१३))
अशा प्रकारे आश्रमातील सर्व साधकांचे वाढदिवस साजरे केले जातात. साधकाच्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील भोजनकक्षातील फलकावर साधकाचे नाव लिहून त्याला शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे सर्वच साधकांना त्या साधकाच्या वाढदिवसाविषयी कळते. त्या साधकासमवेत सेवा करणारे साधक त्याच्यासाठी स्वहस्ते छानसे शुभेच्छापत्र बनवतात. त्याची गुणवैशिष्ट्ये वर्णन करणारे काव्य केले जाते. आश्रमातील अनेक साधक साधनेसाठी शुभेच्छा देतात. अशा प्रकारे त्या साधकाचा वाढदिवस अत्यंत आनंदाने साजरा केला जातो.
२ आ. विवाह, मौजीबंधन आदी मंगल कार्यांनंतरही परात्पर गुरु डॉक्टर नवदांपत्याला अथवा संबंधित कुटुंबियांना भेटून आशीर्वाद देतात. जीवनाच्या नव्या पर्वाचा आरंभ करतांना गुरूंचे हे अनमोल आशीर्वाद साधकही हृदयमंदिरात साठवून ठेवतात.
३. साधक घरी जातांना त्याच्या समवेत सर्वांना खाऊ पाठवणे
३ अ. साधकांना त्यांच्या आवडीनुसार खाऊ देणे : ‘परात्पर गुरु डॉक्टर अनेक साधकांना खाऊ द्यायला सांगतात. तेव्हा ते तरुण, लहान मुले, वयस्कर यांचा विचार करून त्यांना आवडेल असा खाऊ देतात. ‘गोड आवडते कि तिखट ?’, तेही विचारून घेतात. त्रास असलेल्या साधकांची चौकशी करून त्यांनाही ते खाऊ पाठवतात. ते आश्रमातून घरी जाणार्या साधकासमवेत त्याच्या घरचे, तसेच तेथील संत आणि धर्माभिमानी अशा सगळ्यांना खाऊ द्यायला सांगतात. एवढेच नव्हे, तर त्या साधकाच्या गावातील साधकांनाही ते आवर्जून खाऊ पाठवायला सांगतात.’ – श्री. प्रकाश रा. मराठे, गोवा.
सनातनचे अनेक साधक विविध जिल्ह्यांत, विविध राज्यांत धर्मप्रसारासाठी जातात. अशा वेळेला इतर प्रांतात गेल्यावर तेथे जे उपलब्ध होईल, ते प्रसाद म्हणून ग्रहण करून ते आनंदाने धर्मप्रसार करत असतात. अखिल भारतीय हिंदू अधिवेशन किंवा साधनाविषयक शिबिर यांच्या निमित्ताने जेव्हा सर्वत्रचे साधक रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात एकत्र येतात, तेव्हा काही कारणाने दूर गेलेली लेकरे घरी परतल्यानंतर आईला जसा आनंद होतो, तशाच आनंदाने विविध पदार्थ केले जातात. वर्षातून कधीतरी गुरुमाऊलीच्या कुशीत येणार्या या साधकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन निरनिराळे पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालण्याची शिकवणही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच ! घरी राहून प्रसारसेवा करणार्यांना किंवा आश्रमांत राहून धर्मसेवा करणार्या साधकांना आपसूकच काही ना काही कारणाने गोडधोड दिले जाते. जे साधक बाहेरच्या प्रांतांत जाऊन धर्मसेवा करतात, त्यांचे प.पू. डॉक्टरांना विशेष कौतुक आहे.
अशा एक ना अनेक प्रसंगांत गुरुदेव साधकांची माऊली बनले आहेत. सख्खे कुटुंबीयही करू शकणार नाहीत, इतके प्रेम केवळ तेच करू शकतात ! त्यांच्या प्रीतीचे प्रसंग व्यक्त करण्यास शब्दही असमर्थ आहेत. केवळ ती वात्सल्यमय प्रीती अनुभवून त्यांच्या प्रीतीसागरातील क्षणमोती मनमंदिरात साठवून ठेवणे, इतकेच आपण करू शकतो. हे गुरुमाऊली, कृतज्ञता काय व्यक्त करणार ? आम्हाला आपल्या प्रीतीच्या बंधनात ठेवावे, आपली चरणी स्थान द्यावे, हीच प्रार्थना !
साधिकेच्या प्राणांचे रक्षण होण्यासाठी स्वतःचे आयुष्य तिला देण्याची इच्छा व्यक्त करणे
सनातनच्या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. दीपाली मतकर यांची प्रकृती ऑक्टोबर २०१६ मध्ये अत्यंत गंभीर होती. त्यांच्यावरील हे प्राणांतिक संकट दूर होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी संतांना नामजप करण्यास सांगितला. महर्षींनाही कु. दीपाली यांच्या प्रकृतीसाठी परिहार विचारून यज्ञ करण्यात आला. असे असूनही कु. दीपाली मतकर यांची प्रकृती सुधारल्यावर जेव्हा त्या परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला आल्या, तेव्हा झालेला अत्यंत हृदयस्पर्शी संवाद –
परात्पर गुरु डॉक्टर : मला माझी एक चूक लक्षात आली. तुझी स्थिती गंभीर असल्याचे समजल्यावर मला वाटले, ‘माझे आयुष्य तुला द्यावे’; पण नंतर लक्षात आले, संतांच्या सांगण्याप्रमाणे आता माझे आयुष्य फारतर २ – ३ वर्षेच आहे. तेवढेच आयुष्य तुला देऊन काय उपयोग ? तुला अजून ५० – ६० वर्षे कार्य करायचे आहे.’’
कु. दीपाली मतकर : तुमच्यामुळेच मी जिवंत आहे. तुमच्या कृपेमुळेच महर्षि, संत आणि साधक नामजपादी उपाय करत होते. ‘परम गुरुजीच (प.पू. डॉक्टरच) वाचवू शकतात’, असे महर्षि म्हणाल्याचे सद्गुरु गाडगीळकाकूंनी सांगितले, म्हणजे तुमच्यामुळेच मी जिवंत आहे. (‘तेव्हा मला फार कृतज्ञता वाटत होती. मीच नाही, तर सर्व साधक या घोर कलियुगात गुरुमाऊलीमुळेच सुरक्षित आहेत. त्यांच्या कृपेमुळेच श्वास घेत आहेत. साधकांचे सर्व त्रास ते आपल्यावर घेत आहेत.’ – कु. दीपाली मतकर)
विवाह सुनिश्चित झालेल्या साधिकेला आवडते, ते सर्व देण्यास सांगणे : ‘वर्ष २००६ मध्ये एका साधिकेचा विवाह सुनिश्चित झाला होता. तिला भेटण्यासाठी मी जाणार होते. मी निघण्यापूर्वी प.पू. डॉक्टरांनी मला बोलावून थोडे पैसे दिले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही दोघी बाहेर खरेदीला जाणार आहात. तेव्हा तिला काय आवडते, ते घेऊन द्या. बाहेर जाणार असल्याने खाण्या-पिण्यासाठी हे पैसे वापरा. काही उणे पडू देऊ नका. हल्ली किती पैसे लागतात मला ठाऊक नाही. आणखी हवेत तर सांगा. आईस्क्रीम किंवा जे काही तिला आवडते, ते तिला द्या. आपल्या वतीने तिचे केळवणही करा. आपण नाहीतर तिचे कोण कौतुक करणार ?’ – सौ. मनीषा पानसरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
आताही आश्रमातील साधकांचे विवाहापूर्वी केळवण केले जाते. त्या वेळी साधकाच्या विभागातील साधक एकत्र येऊन त्या साधकांना पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देतात.
रुग्ण साधकांची सर्वतोपरी काळजी घेणारे भक्तवत्सल !
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो । तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो ॥ तुम ही हो साथी, तुम ही सहारे । कोई ना अपना सिवा तुम्हारे ॥
अ. रुग्णावस्थेतील साधकाला काही उणे पडायला नको; म्हणून सतत त्याची विचारपूस करणे : ‘रुग्णाईत साधकाला भेटण्यासाठी स्वतःला पायर्या चढणे शक्य नसतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले दादरा (जिना) चढून रुग्णाईत साधकाला भेटतात. त्याला भेटून ते ‘त्याला काही अडचण आहे का ?’ आदी विचारपूस करतात. त्याला आवडतात, ते पदार्थ बनवून द्यायला सांगतात. त्या साधकाला काही उणे पडायला नको; म्हणून ते काळजी घेतात. तसेच निरनिराळ्या उपायपद्धती शोधून त्या साधकाला लवकर बरे करतात.’ – कु. तृप्ती गावडे, रामनाथी, गोवा. (१०.५.२०१८)
आ. साधिकेला मरणयातना होऊ नयेत, यासाठी स्वत: नामजपादी उपाय करून साधिकेचा प्राण वरवर सरकवणे : दुर्धर व्याधी असलेल्या एका साधिकेच्या मृत्यूसमयी तिच्या वेदना सुसह्य व्हाव्यात, यासाठी प.पू. डॉक्टरांनी स्वतः नामजप केला. त्यामुळे मृत्यूसमयी कोणत्याही प्रकारच्या यातना न होता आनंदाने तिला मृत्यूला कवटाळता आले. प.पू. डॉक्टरांच्या प्रीतीमुळे अनेक साधकांचे जीवन आणि मरण सुसह्य झाले आहे.’ – कु. मधुरा भोसले, रामनाथी, गोवा. (८.१.२०१३)
इ. त्वचारोगामुळे जर्जर झालेला विदेशातील एक साधक आपल्या आजारामुळे इतरांना किळस वाटू नये, यासाठी पूर्ण शरीर झाकून ठेवायचा. त्याला प.पू. डॉक्टरांसमोर जायला संकोच वाटत असतांना प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. त्याला पायांतील मोजे काढायला लावून त्याच्या व्याधीचे स्वरूप पाहिले. त्यांच्या या प्रेमामुळे त्या साधकामध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण झाली. – श्री. योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
आताही सनातनच्या आश्रमात साधकांची अत्यंत प्रेमाने आणि आपलेपणाने काळजी घेतली जाते !
परात्पर गुरु डॉक्टरांच्या शिकवणीमुळे सनातनच्या आश्रमांतील सर्वच साधक हे रुग्णाईत आणि वयस्कर साधकांची अत्यंत आपुलकीने काळजी घेतात. त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या पथ्यानुसार आहार देणे अशी सर्व काळजी घेतली जाते. खोलीत झोपून रहावे लागल्यास त्याला भेटून साधनाविषयक सूत्रे सांगून प्रोत्साहित करणे, वाचनासाठी काही ग्रंथ उपलब्ध करून देणे, हेही ओघानेच होते. गेल्या काही वर्षांपूर्वीच परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले आहे की, येत्या काळात सनातन वानप्रस्थाश्रमाचीही स्थापना करणार आहे. ज्या साधकांनी जन्मभर ईश्वरप्राप्तीसाठी साधना केली आहे, त्या साधकांचे मन उतारवयातही मायेत रमत नाही. अशा साधकांची शेवटपर्यंत काळजी घेता यावी आणि त्यांना साधनेचे वातावरण लाभावे, हा त्यामागील उद्देश आहे. खरंच, या प्रेमाला उपमाच नाही !