वर्षारंभी सत्त्वगुणी समाजबांधवांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करा !

गुढीपाडव्याचा शुभसंदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सध्या समाज, राष्ट्र आणि विश्‍व यांच्यावर कोरोना साथीचे संकट ओढवले आहे. काही काळापूर्वी देशभर पेटलेल्या दंगली, धार्मिक विद्वेष आणि देशविरोधकांचे ऐक्य, तसेच आता उद्भवलेली विषाणूची साथ या स्थुलातून दिसणार्‍या घटना भावी भीषण संघर्षाचे आव्हान सांगणार्‍या आहेत. कालमहिमा आणि धर्माला आलेली ग्लानी यांमुळे हे घडणारच होते. यापुढील काळही भीषण आहे. अशा भीषण काळामध्ये, म्हणजेच वर्ष २०२० ते २०२३ या कालावधीमध्ये भावनिक किंवा घटनाविरोधी कृती न करता सत्त्वगुणी समाजबांधवांचे रक्षण करणे, हे काळानुसार धर्मरक्षणाचे कार्य ठरणार आहे. सज्जन, सदाचरणी, भक्त, साधक, संत इत्यादी घटक सत्त्वगुणी समाजाच्या अंतर्गत येतात.

गुढीपाडवा हा हिंंदूंचा मंगल दिवस आणि नववर्षारंभ आहे. खरे तर या दिवशी शुभ संकल्प आणि धर्माच्या हिताच्या प्रतिज्ञा केल्या जातात. हिंदूंनो, सध्याचा संकटकाळ पहाता सत्त्वगुणी लोकांचे रक्षण करण्यासाठी तन-मन-धन समर्पित करण्याची प्रतिज्ञा करा. भविष्यात होणार्‍या धर्मसंस्थापनेच्या महान कार्यासाठी सध्याच्या काळात हीच प्रतिज्ञा उपयुक्त ठरील !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.