‘हिंदु देवस्थान ट्रस्ट’च्या भूमी हडपणारी यंत्रणा सक्रिय; विरोधकांकडून सरकारवर टीका !

मुंबई, १० जुलै (वार्ता.) – राज्याचे पावसाळी अधिवेशन केवळ पुरवण्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आणि घाईघाईने विधेयके संमत करण्यासाठीच आयोजित करण्यात आले होते, असा घणाघाती आरोप महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केला. ‘हिंदु देवस्थान ट्रस्ट’च्या सहस्रो एकर भूमी हडपण्याचे मोठी यंत्रणा कार्यरत आहे. यातील गुन्हेगार उजळ माथ्याने फिरत असून यावर महसूलमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. सभागृहाचे कामकाज पूर्ण ताकदीने चालवूनही सरकारने जनतेच्या मूळ प्रश्नांना आणि लोकशाहीच्या परंपरांना केराची टोपली दाखवली आहे, असा आरोप विरोधी गटातील नेते जयंत पाटील, भास्कर जाधव, नाना पटोले यांनी १० जुलै या दिवशी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. ‘सर्व विरोधकांत कोणतेही मतभेद नसून समन्वय चांगला आहे’, असेही सर्वांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अतीवृष्टीमुळे झालेली हानी ही नैसर्गिक नसून सरकारच्या भ्रष्ट कामांमुळे झालेली मानवनिर्मित आपत्ती आहे. सिद्धिविनायक, पंढरपूर, रामटेक या देवस्थानांमध्ये सरकारीकरणाचा गदारोळ आहे. शेगावच्या गजानन महाराज मंदिराच्या सात्त्विक आणि पारदर्शक व्यवस्थापनाचा आदर्श घ्यायला हवा.