आक्रमणाची चौकशी होणार !

शिरपूर येथील  वाळू चोरीचे प्रकरण

मंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, १० जुलै (वार्ता.) – शिरपूर येथे घडलेल्या वाळू चोरीच्या आणि शासकीय कर्मचार्‍यांवर झालेल्या जीवघेण्या आक्रमणाच्या गुन्ह्याची वरिष्ठ अधिकार्‍यांच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्यात येईल. या प्रकरणी पोलीस महानिरीक्षक स्तरावरूनही आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी १० जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना ते बोलत होते.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, वाळूची अवैध वाहतूक आणि चोरी यांसंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाळूची चोरी करणार्‍या एका वाहनाचा पाठलाग करत असतांना संबंधित मंडळ अधिकारी आणि इतर शासकीय कर्मचारी यांना चालकाने वाहनाने धडक देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वाहन थांबवल्यानंतर चालकाने समाजकंटकांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि कर्तव्य बजावणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या अन्वेषणात समोर आली आहे. प्रशासनाकडून कोणतीही सूडबुद्धी ठेवून कारवाई करण्यात आलेली नाही.