देशातील शाळांमध्ये ५ सहस्रांची घट, तर सरकारी शाळांच्या तुलनेत खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाढ

नवी देहली – केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘यूडायस प्लस’ या अहवालानुसार केवळ एकाच वर्षात देशातील शाळांची संख्या ५ सहस्रांनी घटली आहे.

त्याच वेळी सरकारी शाळांच्या तुलनेत खासगी शाळांतील विद्यार्थ्यांचा टक्का वाढत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

१. ‘यूडायस प्लस’च्या वर्ष २०२४-२५ या अहवालात देशात १४ लाख ७१ सहस्र ७४३ लाख शाळा असल्याचे म्हटले होते; मात्र वर्ष २०२५-२६ साठीच्या अहवालात देशात १४ लाख ६६ सहस्र ६८२ लाख शाळा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकाच वर्षात ५ सहस्र ६१ शाळा अल्प झाल्याचे दिसून येते.

२. अहवालानुसार शिक्षकांच्या संख्येत ८.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे या गुणोत्तरात सुधारणा झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

३. अहवालानुसार पायाभूत ते माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षणातील एकूण विद्यार्थी नोंदणी वर्ष २०२५-२६ मध्ये २४ कोटी ७२ लाख होती. वर्ष २०२३-२४ मध्ये २४ कोटी ८० लाख विद्यार्थिसंख्या नोंदवण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थिसंख्येत घट झाली आहे.

४. सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची नोंदणी १२ कोटी ७५ लाखवरून ११ कोटी ८९ लाखापर्यंत अल्प झाली आहे. त्यामुळे सरकारी शाळांतील विद्यार्थी ८६ लाखांनी अल्प झाले आहेत, तर विनाअनुदानित खासगी मान्यताप्राप्त शाळांतील विद्यार्थीसंख्या ९ कोटींवरून ९ कोटी ८९ लाख इतकी वाढली आहे. त्यामुळे एका वर्षातच ८८ लाख विद्यार्थी खासगी शाळांकडे वळल्याचे दिसून येते.

संपादकीय भूमिका

सरकारी शाळांमधून शिकवण्यात येणार्‍या शिक्षणाचा स्तर जनतेच्या दृष्टीने न्यून असल्याने ते पाल्यांना खासगी शाळांमध्ये घालत आहे, असेच दृश्य आहे. यावर सरकार कधी विचार करणार ?