आता मृतदेहाची चिरफाड न करता शवविच्छेदन केले जाईल !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – मृतदेहाचे शवविच्छेदन करतांना आपण ‘नॉन इन्व्हेसिव्ह’ (शस्त्रक्रिया न करता) पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रक्रियेत मृतदेहाची कोणतीही चिरफाड न करता अद्ययावत् यंत्राद्वारे शवविच्छेदन होईल. त्यातून सूक्ष्मातील सूक्ष्म ही दिसून येईल. ही यंत्रे येत्या २ ते ३ महिन्यांत मुंबई शहरात प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. भाजपच्या सदस्या चित्रा वाघ यांनी ‘राज्यातील रुग्णालयांतील शवविच्छेदक संवर्गातील रिक्त पदे भरण्याविषयी’चा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली सूत्रे

१. पूर्वी सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करत नव्हतो. आता ती परिस्थिती नाही.  शवविच्छेदक आणि शवविच्छेदक सेवक यांची भरती ९० दिवसांमध्ये शक्य होणार नाही. ती आपण लवकरात लवकर करू. शवविच्छेदनाविषयी अनेक तक्रारी येतात. या नवीन यंत्राद्वारे शवविच्छेदन केल्यास ९० टक्के तक्रारी अल्प होतील.

२. शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ (शरिराचा महत्त्वाचा भाग) राखून ठेवला जातो. त्याची पडताळणी करण्यास विलंब होतो. २ ते ३ वर्षे लागतात. गेल्या २ ते ३ वर्षांत ३ लाख ‘व्हिसेरा’ पडताळणी होती ती सध्या ७५ सहस्र एवढी आली आहे.

३. सध्या राज्यात ५३३ शवविच्छेदन केंद्रे आहेत. त्यातून १० सहस्र ९०५ शवविच्छेदन केले गेले. तेथील कर्मचार्‍यांच्या व्यवस्थेचा आढावा घेऊ.