रावेत (पुणे) येथे नागरिकांचा ‘महावितरण’च्या कार्यालयासमोर मोर्चा !

पुणे – रावेत परिसरात सलग २-३ दिवस वीजपुरवठा खंडित केल्यामुळे त्रस्त झालेल्या अनेक गृहनिर्माण संकुलामधील नागरिकांनी ‘महावितरण’च्या कार्यालयासमोर मोर्चा काढत तीव्र घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. यामुळे अनेक गृहनिर्माण संकुलांमध्ये पाणीटंचाई, उद्वाहन यंत्रणा ठप्प, वैद्यकीय सेवा घेण्यास अडथळे, बालके आणि ज्येष्ठ नागरिक यांचे हाल अन् कार्यालयीन  कामांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, अशी चेतावणी नागरिकांनी दिली आहे. (विजेसारख्या आवश्यक गोष्टीसाठी नागरिकांना मोर्चा काढावा लागणे, हे गंभीर आहे ! – संपादक)

शहरात आणि आजूबाजूला चालू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे ‘महावितरण’कडून सुरक्षतेचा उपाय म्हणून काही भागांतील वीजपुरवठा खंडित केला आहे. अनेक ठिकाणी वीज यंत्रणांमध्ये पाणी साचल्याने वीजपुरवठा खंडित केला असून परिस्थिती पूर्वपदावर येताच वीजपुरवठा चालू करण्यात येईल, असे ‘महावितरण’कडून कळवण्यात आले.

राजगुरुनगर विभागात ५६९ रोहित्रांचा वीजपुरवठा बंद केला. चाकण शहरातील २ फिडर बंद केल्याने ३३९ रोहित्रे बंद झाली. वडगाव मावळ ३९, लोणावळा ६८, तळेगाव १८ अशी रोहित्रे सुरक्षेसाठी बंद केली आहेत.

भोसरी विभागात देहूगाव येथील २२ केव्ही फिडर बंद केला. पाण्याची पातळी वीज यंत्रणांच्या आतील भागात पोचल्याने वीजपुरवठा बंद केला. नगर रस्ता विभाग आणि पिंपरी विभागातही असेच चित्र आहे.