पुणे येथे बिश्नोई टोळीचे खंडणी जाळे उद्ध्वस्त : ४ जणांना अटक

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून ५ राज्यांत ५ सहस्र कि.मी. पाठलाग !

 

पुणे – शहरातील व्यावसायिक आणि उद्योजक यांना खंडणीसाठी धमकावणार्‍या बिश्नोई टोळीचे जाळे पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणात खंडणीसाठी गोळीबार करणार्‍या दोघांसह एकूण ४ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३ अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सलग १५ दिवस ५ राज्यांमध्ये ५ सहस्र कि.मी.चा पाठलाग करत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.

या प्रकरणातील मुख्य संशयित आणि प्रत्यक्ष गोळीबार करणारा आरोपी पवनकुमार याला ३ दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसरा मुख्य आरोपी रविकुमार याला एका अल्पवयीन साथीदारासह पंजाबमधील भटिंडा येथून कह्यात घेण्यात आले, तसेच या आरोपींना पुण्यात स्थानिक पातळीवर साहाय्य करणार्‍या सत्यप्रकाशलाही पोलिसांनी गजाआड केले आहे. हे आरोपी मूळचे हरियाणा आणि राजस्थान येथील रहिवासी असून पूर्वी ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात एका स्टील आस्थापनात काम करत होते.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त हसन गौहर यांच्या नेतृत्वाखाली ५ पथकांनी ही मोहीम राबवली. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब अशा ५ राज्यांमध्ये ही शोधमोहीम चालली. कामगिरीविषयी पथकांना ५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित झाले.