जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भक्तीमय वातावरण देहूतून प्रस्थान !

नव्या चांदीच्या रथातून पादुकांचा सोहळा !

देहू (जिल्हा पुणे) – ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’ या अखंड जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे ७ जुलैला श्री क्षेत्र देहू येथून अत्यंत भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. दुपारी २ ते ४ या वेळेत विधीवत् पूजा संपन्न झाली. या सोहळ्याला राज्यभरातून आलेल्या लाखो वारकर्‍यांसह प्रमुख मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. संपूर्ण देहूनगरी प्रस्थान सोहळ्यामुळे भक्तीचैतन्यात दंग झाली होती. पालखीचा पहिला मुक्काम देहूतच इनामदार वाड्यात असणार आहे.

प्रस्थान सोहळ्याचा प्रारंभ पहाटे ५ वाजल्यापासून चालू झाला. शिळा मंदिर, तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा झाली. इनामदार वाड्यात जगद्गुरु तुकोबांच्या पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले.

ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन !

दुपारी अडीच वाजता इनामदार वाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आल्या. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. या वेळी आलेल्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या ताटात चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. दुपारी ४ वाजून २ मिनिटांनी पालखीने प्रस्थान केले.

पहिल्यांदाच नव्या चांदीच्या रथातून पालखीचे प्रस्थान !

यंदाच्या वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुका प्रथमच नव्याने सिद्ध करण्यात आलेल्या चांदीच्या रथात विराजमान होणार आहेत. या नव्या रथाचे वजन जुन्या रथाच्या तुलनेत ६०० किलोने अल्प करण्यात आले आहे.

इनामदार वाड्यात पालखी सोहळ्याचा मुक्काम !

सायंकाळी ५ वाजता पालखी प्रदक्षिणा झाल्यावर, पालखी इनामदार वाड्याकडे मार्गस्थ झाली आणि रात्री इनामदार वाड्यात पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर पालखी आकुर्डी, पुणे शहर (नाना पेठ, निवडुंगा विठोबा मंदिर), लोणी काळभोर करत पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.

पावसाची विश्रांती !

इंद्रायणी नदीची वाढती पातळी आणि मुसळधार पाऊस पहाता वारकर्‍यांनी देहू आणि आळंदी येथे गर्दी न करता थेट पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून किंवा त्यापुढील मार्गावरून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, दोन्ही देवस्थान संस्थानने केले होते; परंतु ७ जुलैला सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे वारकरी मोठ्या संख्येने देहू येथे आले होते.