परिवहन विभागात भ्रष्टाचाराची बजबजपुरी : परिवहनमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्र्यांना माहिती !

भ्रष्ट अधिकार्‍यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई – परिवहन विभागातील निवृत्त आणि सध्या कार्यरत असलेले काही अधिकारी भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले असल्याची माहिती स्वत: परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात दिली. याविषयी ३ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली असल्याचेही प्रताप सरनाईक यांनी सभागृहात सांगितले. याविषयी मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा विधानसभेत केली.

निवृत्त परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, अकोला येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, अमरावतीचे निलंबित मोटार वाहन निरीक्षक राजू नागरे, गोंदिया येथील मोटार वाहन निरीक्षक आनंद मोहोड आणि खामगावचे निलंबित मोटार वाहन निरीक्षक योगेश खेसनार हे अधिकारी मिळून अवैधपणे पैशांची वसुली करत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ७ जुलै या दिवशी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला.

दोषींवर कठोर कारवाई केली जाईल ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

यावर मंत्री सरनाईक म्हणाले की, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रियांका ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय विशेष अन्वेषण पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. बजरंग खरमाटे यांच्याविषयी आधी आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने या प्रकरणाचे आर्थिक गुन्हे शाखेकडून अन्वेषण चालू करण्यात आले आहे. विशेष अन्वेषण समितीचा अहवाल एका मासात प्राप्त होईल. त्यानंतर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात राहून अन्य राज्यांत वाहन नोंदणी करणार्‍या करबुडव्यांवर चाप लावण्यासाठी नियम अधिक कठोर केले जातील. भविष्यात वाहन नोंदणी करतांना बँक कर्ज, स्थानिक रहिवासाचा पुरावा आणि जी.एस्.टी. पडताळणीची काटेकोर पडताळणी करणारी सक्षम यंत्रणा निर्माण केली जाईल.