मंचर (पुणे) येथे बनावट दुधाची निर्मिती करणार्‍या टोळीला अटक !

२६ आरोपींवर गुन्हा नोंद, तर १३ जण अटकेत

मंचर (पुणे) – मंचर परिसरात बनावट दुधाची निर्मिती करणार्‍या मोठ्या टोळीला अन्न सुरक्षा विभागाने अटक केली. या प्रकरणात मंचर पोलीस ठाण्यात २६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांपैकी १३ आरोपींना अटक केली आहे.  या आरोपींना घोडेगाव न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या कारवाईत २ लाख ४ सहस्र ४९० रुपयांचा मुद्देमाल आणि १ सहस्र ३८५ किलो भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले.

या टोळीचे कार्यक्षेत्र पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि ठाणे या जिल्ह्यांपर्यंत विस्तारलेले आहे. याची व्याप्ती अजून मोठी असण्याची शक्यता अन्वेषण यंत्रणेने व्यक्त केली असून अधिकचे अन्वेषण चालू आहे.

आर्थिक लाभासाठी आरोपींनी विविध रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध सिद्ध करणे, त्याची साठवणूक करणे आणि विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचे अन्वेषण मंचर पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाकडून चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • जनतेच्या आरोग्याची हानी होऊ देणार्‍यांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा द्यायला हवी !
  • ‘मनुष्यच मनुष्याचा वैरी’ ही स्थिती जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा दुष्परिणाम ! प्रशासनाने जनतेला धर्मशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये नैतिकमूल्ये वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !