शाळेच्या परिसरात कॅफिनयुक्त पेयांवर बंदी ! – नरहरी झिरवाळ

पनवेल – शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण करणार्‍या अन्नपदार्थांच्या आणि विशेषतः ‘स्टिंग’सारख्या कॅफिनयुक्त ऊर्जा पेयांच्या विक्रीविरोधात शासनाने कडक पावले उचलली आहेत. विधानसभेत आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही माहिती दिली. शाळेच्या परिसरात अशा अपायकारक पेयांची किंवा पदार्थांची विक्री आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. या प्रतिबंधात्मक मोहिमेत शाळाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषद यांना सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आले असून बेकायदेशीर विक्री आढळल्यास त्याची मािहती प्रशासनाला देण्याचे आवाहन केले.

राज्यातील अन्न व औषध नमुन्यांची पडताळणी अधिक गतीने व्हावी, यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार केला जात आहे. सध्या महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर येथे ३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या सुविधेत भर घालत आता रायगड, नाशिक, यवतमाळ आणि पुणे येथे नवीन शासकीय प्रयोगशाळा चालू करण्यात येणार आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर आणखी २२ नवीन प्रयोगशाळा उभारण्याचे नियोजन असून यामुळे ‘राज्यात अन्न व औषध नमुने तपासण्याची प्रक्रिया अत्यंत वेगवान आणि पारदर्शक होईल’, असा विश्वास मंत्री झिरवाळ यांनी व्यक्त केला.