प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे आयुक्तांसमवेत बैठक घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करणार ! – गृहराज्यमंत्री

  • संशयितांना शोधण्यासाठी चेहरा ओळखणारी प्रणाली कार्यान्वित !

  • ६ सहस्र सीसीटीव्ही कार्यरत

मुंबई, २ जुलै (वार्ता.) – मुंबई लोकल आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकार अत्यंत गंभीर असून पुढील १५ दिवसांत रेल्वे आयुक्तांची विशेष बैठक बोलावण्यात येईल. या बैठकीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा आढावा घेऊन २५ दिवसांच्या आत संपूर्ण परिस्थितीचा पुनर्विकास केला जाईल. रेल्वे परिसरात कोणतीही गुन्हेगारी टोळी कार्यरत असल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी २ जुलै या दिवशी विधानपरिषदेत दिले. २३ जून या दिवशी चर्चगेट-नालासोपारा धावत्या लोकलमधील प्रथमश्रेणी डब्यात दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून मयंक लोहार या निष्पाप तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या अत्यंत गंभीर घटनेविषयी सदस्य श्री. रवींद्र फाटक यांनी नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचना मांडली होती. तिला उत्तर देतांना गृहराज्यमंत्र्यांनी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती दिली.

ते म्हणाले की,

१. मुंबई लोकलने प्रतिदिन लाखो प्रवासी प्रवास करत असल्याने त्यांचे ‘फिजिकल स्कॅनिंग’ (शारीरिक पडताळणी) करणे शक्य नाही; मात्र सुरक्षेला प्राधान्य देत रेल्वे पोलिसांचे विशेष पथक सिद्ध करण्यात आले असून प्लॅटफॉर्मवर संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तिची त्वरित पडताळणी केली जाते.

२. रेल्वे पोलीस अचानक डबे आणि फलाट यांची पडताळणी करत आहेत. राज्यातील १९७ रेल्वेस्थानकांवर ६ सहस्र ८९९ सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेसाठी २४ घंटे कार्यरत आहेत. कॅमेर्‍यांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

३. रेल्वे स्थानकांवर कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित ‘चेहरा ओळखणारी प्रणाली’ कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे पसार आरोपी, तडीपार गुन्हेगार आणि संशयितांचा माग काढणे सुलभ झाले आहे. याच प्रणालीच्या आधारे मयंक लोहार यांच्या हत्येतील आरोपीला १५ घंट्यांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले.

४. आतापर्यंत ३५० सराईत गुन्हेगारांवर तडीपाराची कारवाई करण्यात आली आहे.

५. मध्यप्रदेशातून होणार्‍या अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणी १३३ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. रेल्वेच्या ‘१९१२’ या आपत्कालीन हेल्पलाईनवर १ लाख ५६ सहस्र संपर्क आले असून त्याद्वारे ५३ सहस्र प्रवाशांना तात्काळ साहाय्य पुरवले आहे.

६. रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत लोकलगाड्यांमध्ये आणि महिलांच्या डब्यात विशेष सुरक्षेसाठी होमगार्डचे जवान तैनात केले जातात.