भारताची प्रगती मंद गतीने; परंतु तेथे लोकशाही असणे, ही चांगली गोष्ट !

  • ‘पेप्सिको’च्या माजी अध्यक्षा इंद्रा नूई यांनी भारताची चीनशी केली तुलना

  • चीनने केंद्रीकृत प्रणाली अवलंबल्याने झाली झपाट्याने प्रगती

इंद्रा नूई

नवी देहली – चीनला दारिद्र्यातून बाहेर काढणार्‍या तिथल्या व्यवस्थेचा मी आदर करते. केंद्रीकृत पद्धतीने काम केल्यामुळेच तो जागतिक महासत्ता बनू शकला. भारत मात्र जागतिक महासत्ता बनण्यासाठी अजूनही संघर्ष करत आहे; कारण येथे लोकशाही आहे आणि जेव्हा प्रत्येकाला मतदानाचा आणि स्वत:चे म्हणणे मांडण्याचा अधिकार असतो, तेव्हा प्रगतीचा वेग मंदावतो. तथापि परिस्थिती अशी आहे, याचा मला आनंदच आहे, असे वक्तव्य ‘पेप्सिको’ आस्थापनाच्या माजी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूई यांनी केले. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव काँडोलिसा राईस यांच्याशी संवाद साधतांना ७० वर्षीय नूई यांनी हे भाष्य केले.

नूई म्हणाल्या की,

१. चीनच्या केंद्रीकृत प्रणाली अवलंबल्याने तेथे व्यक्तीचे अधिकार जपणार्‍या संस्थात्मक ‘नियंत्रण आणि समतोल’ यंत्रणेचा अभाव आहे. हा भेद स्पष्ट करण्यासाठी त्यांनी भारतातील न्यायव्यवस्थेच्या दृश्य स्वरूपाकडे निर्देश केला.

२. अमेरिकेतील शहरांप्रमाणेच भारतातील प्रत्येक मोठ्या शहरात एक न्यायालय असते. चीनमध्ये मात्र न्यायालये नाहीत; कारण तिथे सरकारच नियम बनवणारे आणि निर्णय घेणारे असते अन् म्हणूनच तिथे समस्या निर्माण होते. आपली न्यायव्यवस्था जी लोकांना स्पष्टपणे दिसते, तीच त्यांना हा दिलासा देते की, या देशात त्यांनाही काही अधिकार आहेत.

(म्हणे) ‘भारताचे सौंदर्य त्याच्या गोंधळातच दडले आहे !’ – नूई यांचे भारतातील पर्यटनावर भाष्य

नूई यांना राईस यांनी चीनच्या तुलनेत भारतात पाश्चात्त्य पर्यटकांच्या दृष्टीने काय भेद आहे, असे विचारले. यावर त्या म्हणाल्या की, चीन हा तुलनात्मकदृष्ट्या एकजिनसी आहे, ज्यामुळे तिथे येणार्‍या पर्यटकांसाठी फिरणे सोपे जाते. याउलट भारताचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तेथील ‘गोंधळ आणि धावपळ’. भारताचे सौंदर्य तिथल्या गोंधळातच दडले आहे. ज्या लोकांना या देशाची सवय आहे, त्यांना येथील अनपेक्षित गोष्टींची आवड निर्माण होते.

त्या पुढे म्हणाल्या की, हा गोंधळ एखाद्या नशेसारखा आहे. तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. त्यांनी भारतातील रस्त्यांवरील जीवनाचाही उल्लेख करतांना वाहनांसमवेत रस्त्यांवर गायीसुद्धा सर्रास पहायला मिळतात, असे म्हटले. अशी दृश्ये पहिल्यांदाच येणार्‍या आणि शिस्तप्रिय, तसेच स्वच्छ परिसर आवडणार्‍या पर्यटकांना संभ्रमात टाकू शकतात; परंतु अनेक भारतियांसाठी या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहेत. भारतीय लोक अनेकदा ‘हे दिवसही निघून जातील’ अशी मानसिकता स्वीकारतात आणि या अव्यवस्थेला देशाच्या सामाजिक संरचनेचा एक भाग मानतात.

संपादकीय भूमिका

पर्यटनाच्या माध्यमातून भारत त्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा वेळी नूई यांसारख्या यशस्वी भारतियाने त्याला मारक असे वक्तव्य करणे श्रेयस्कर नाही !