आळंदी (जिल्हा पुणे) येथील एस्.टी.च्या बसस्थानकात खड्डे, चिखल : वारकर्‍यांना असुविधा !

दैनिक ‘सनातन प्रभात’ विशेष वृत्त

पाणी साचलेले आणि सर्वत्र चिखल झालेले राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक

खड्डे पडलेले ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड’चे बसस्थानक

आळंदी (जिल्हा पुणे) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी अगदी ५ दिवस राहिलेले असतांना आळंदी येथील राज्य परिवहन महामार्गाच्या बसस्थानकाची स्थिती अत्यंत वाईट आहे. या बसस्थानकात उभे रहाण्यासाठी साधे पत्र्याचे शेडही नाही. पावसामुळे स्थानकात चिखल झाला असून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या बसस्थानकाची स्थिती इतकी वाईट आहे की, स्थानकात चालणेही अशक्य होत आहे. राज्यभरातून ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर करत लाखो वारकरी आळंदीत येतील आणि त्यांचे स्वागत मात्र खड्डे आणि चिखल यांनी होणे दुर्दैवी आहे ! (अल्पसंख्यांकांचे श्रद्धास्थान असते, तर तेथे सोयीसुविधांची खैरात झाली असती; पण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी क्षेत्राच्या ठिकाणी अशी दु:स्थिती होणे दुर्दैवी ! – संपादक)

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पी.एम्.पी.एम्.एल्.)च्या बसस्थानकातही चिखल आणि पाणी !

दुसरीकडे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पी.एम्.पी.एम्.एल्.)च्या बसस्थानकाचाही दुरवस्था असून येथील स्थानकात चिखल आणि पाणी साचल्याने वारकर्‍यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या बसस्थानकात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वयोवृद्ध वारकर्‍यांना बसण्यासाठी कोणतीही सुविधा नसून शहर बस येईपर्यंत त्यांच्यासमोर उभे रहाण्याविना कोणताही पर्याय उपलब्ध नसतो.