आरोग्य योजनांची प्रभावी कार्यवाही ! – आरोग्यमंत्री


मुंबई, २ जुलै (वार्ता.) –
राज्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी ‘महात्मा फुले जनआरोग्य’ आणि ‘आयुष्मान भारत’ योजनांची प्रभावी कार्यवाही करण्यात येत असून केरळच्या यशस्वी मॉडेलचा (प्रतिकृतीचा) अभ्यास करून महाराष्ट्रात ‘पॅलिएटिव्ह केअर’ (पीडाशामक उपचार) सेवांना गती दिली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी २ जुलै या दिवशी विधानपरिषदेत दिली. नियम ९२ अन्वये सदस्य सत्यजित तांबे, डॉ. मनीषा कायंदे आणि कृपाल तुमाने यांनी उपस्थित केलेल्या अर्धा घंटा चर्चेला ते उत्तर देत होते.

आरोग्यमंत्री आबिटकर पुढे म्हणाले की, राज्यातील आरोग्य सेवांचे स्वतंत्र तृतीय पक्षाच्या वतीने (उदा. इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स) मूल्यमापन करण्याविषयी विचार केला जाईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती आता प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत वाढवण्यात आली असून शासकीय आधुनिक वैद्यांचे प्रोत्साहनपर मानधन २० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. खासगी रुग्णालयांची देयके आता महिन्याच्या महिन्याला दिली जात असल्याने त्यांचा विश्वास वाढला आहे, तसेच ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट’ आणि ‘महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना कायद्या’च्या माध्यमातून खासगी रुग्णालयांतील शुल्क नियंत्रणावर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.